Literature

अश्विन शुद्ध पंचमी

आपल्या जीवनामध्ये आपण जे काही करतो ते सूखासाठीच तेव्हा आपले खरे ध्येय ' परमात्मप्राप्ती 'च
आहे असे समजून परमात्मप्राप्तीच आपले जीवनसाफल्य आहे असे मानून त्यासाठी प्रयत्न करणे हेच
आपल्या जीवनाचे, जिविताचे सार्थक होय. जेवण करावयाचे असल्यास ज्याप्रमाणे आपण केळीचे पान,
पत्रावळ, ताट असे काहीतरी घेऊन त्यावर जेवतो त्याप्रमाणे परमात्म्याच्या प्राप्तीसाठी या जीवनाची अपेक्षा
म्हणजे जीवनाचे सौलभ्य, जीवनांचे सौकर्ष व साधन. जेवण ज्याचे करावयाचे ते अन्नच जसे आपणांस पाहिजे
असेल त्याप्रमाणेच !! खरा आनंद म्हणजे परमात्म्याचाच आनंद !

आपला उद्देश परमात्म्यासाठीच असला पाहिजे. त्यास साधन म्हणजे ज्याप्रमाणे भात वाढण्यास केळीचे
पान लागले. त्याप्रमाणे जीवनात प्राप्त होणारे, देहास आवश्यक असलेले विषय, अन्न आहार इत्यादी
परिष्कृत पवित्र अशांची आपण अपेक्षा करून त्याची प्राप्ती करून घेणे हेच आपल्या जीवनाचे, जिवितांचे
साफल्य !! ते सोडून आपण विषयाकडे वळल्यास त्यापासून खऱ्या आनंदाची प्राप्ती झाली. शांति-समाधान
प्राप्त झाले असे आपल्या अनुभवास मुळीच येणार नाही, असे असल्याने आपण आपले जीवन
परमात्मप्राप्तीसाठीच खर्ची घातले पाहिजे, परमात्म्याकडेच लाविले पाहिजे. हेच जीवनाचे एकमेव सार, रहस्य,
ध्येय व लक्ष्य होय.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img