Literature

अश्विन शुद्ध पौर्णिमा

आपल्याला सांप्रत प्राप्त झालेले हे शरीर आत्मज्ञानासाठी अनुकूल असे आहे. आपण आत्मज्ञान प्राप्त केले पाहिजे, संपादन केले पाहिजे. कितीतरी जन्मापासून संसाराची आसक्ती बाळगुन आपण भरकटत भरकटत बधीर होऊन या जन्माला आलो असून आता मात्र त्यात गुरफटून न जाता, त्यात न अडकता, न फसता, आपण त्याला जिंकले पाहिजे.

श्रीसमर्थ सांगतात, *’ नव्हे सार संसार हा घोर आहे | मना सज्जना सत्य शोधूनि पाहे | ‘* हे मना, या संसाराची जी आसक्ती तूं धरली आहेस, तिच्यात काहीच सार नाही, अर्थ नाही. ती अतिशय घोर आहे. तिच्यात दुःखच आहे. तिने परमात्मस्वरूपाचा विसर पडतो, खऱ्या सुखाचा विसर पडतो म्हणूनच जन्ममरण या दुःखाना कारण म्हणून जे आहे ते म्हणजे संसाराची वासना. तिच्यावर तू विश्वास ठेवू नकोस. तुला मी सांगतो म्हणून नव्हे तर तुला आलेल्या अनुभवावरून तु समजुन घे. सत्य कोणते याचे तू परिशोधन कर असे मी तुला प्रेमाने सांगतो.

परमात्म्याचे परिशोधन केले पाहिजे. त्याचे यथार्थ आनंदघनस्वरूप म्हणून जे आहे तेच सत्य, तेच त्रिकालाबाधित सत्य. ते सतत एकाच प्रकारच्या आनंदरूपाने उजळणारे आहे. ते पवित्र आहे. ते प्राप्त केल्यानेच आपण मुक्त होऊ. पण हे सोडून संसाराचे वेड लावून घेऊन, डोके बिघडवून या संसारात गाढवासारखे कितीही राबले, कितीही कष्ट केले, कितीही संपादन केले तरी शेवटी काय प्राप्त होणार ? दुःखच नाही का ? होय, दुःखच, हे नि:संशय.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img