Literature

आत्मज्ञान मीमांसा

“आत्मा च परमात्मा च पर्यायो नात्रभेदधीः” । परमात्मा कोण? आत्मा कोठे असतो व कसा आहे? या प्रश्नाचे उत्तर वरील श्लोकांत देण्यात आले आहे.

“मायामात्रमिदं द्वैतं अद्वैतं परमार्थतः।” यथार्थत्वाने विचार केला असता सर्वत्र परमात्मरूपच आहे. त्यांत ‘मी’ ‘तू’ असे जे व्यावहारिक भेद दिसतात ते मायेमुळेच होत. माया सत्य नाही असे श्रुतींनी सांगितले आहे.

श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथकोटिभिः ।
ब्रह्मसत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः ॥

कोटयावधि ग्रंथांचे तात्पर्य एका श्लोकार्धात सांगावयाचे झाल्यास “ब्रह्म सत्य आहे, त्याहून वेगळे दिसणारे हे जग मिथ्या आहे आणि भ्रमाने भासमान होणारे जीवनसुद्धा यथार्थत्वाने विचार केल्यास ब्रह्मच आहे” असे श्री शंकराचार्यांनी वरील श्लोकांत सांगितले आहे.

सुवर्णमूर्तीत मूळ द्रव्य सुवर्णच असते तद्वत् पिंडब्रह्माण्डात यथार्थत्वाने परमात्म्याचे अद्वैत स्वरूप आहे. संपूर्ण देह, इंद्रियांची रूपे परमात्म्याने आपल्या संकल्पाने सहजरीत्या निर्माण केली आहेत. या सर्वांचे मूळ परमात्माच असून इतर कोणीहि नाही. ज्ञानदृष्टीने विचार केल्यास हे आपणांस समजू शकेल. श्रुतीहि तेंच सांगतात. “स एव सर्वं यद्भुतं यच्च भव्यं सनातनम् ।” भूत, वर्तमान व भविष्य काळांत निर्माण होणारे सर्व परमात्म्यापासूनच उत्पन्न होत असते; असे श्रुती सांगतात. यावरून परमात्मा भूतकाळी होता, आज आहे व भविष्यांतहि असणारच हे उघड होते. त्रिकालांत व तिन्ही लोकांत परमात्मा सर्वव्यापी असून दृश्य अशी सर्व रूपे त्याचीच आहेत.

“ब्रह्मेयीवेदं विश्वमिदं वरिष्ठ।” हे विश्व तिन्ही काळांत आहेच. तें परमात्मस्वरूप असल्यामुळे ते व परमात्मा हे निरनिराळे आहेत असे समजणे चुकीचे आहे. ‘एकमेवाद्वितीयं ब्रह्म” ब्रह्म या नावाने ओळखला जाणारा परमात्मा अद्वितीय आहे असे म्हटल्यानंतर दुसरे कशाचेंहि अस्तित्व असू शकत नाही.

“हिरण्यगर्भा समवर्तताग्रे।” सृष्टीच्या उत्पत्तिपूर्वी परमात्मा हिरण्यरूप होता. “हिरण्यगर्भ जनयामास पूर्व ।’ त्याचे मूळरूप ब्रह्म, आत्मा, परमात्मा असें होतें असें श्रुतींचे म्हणणे आहे.

“अव्यक्तात् पुरुषः परः पुरुषान्नपरं किंचित्साकाष्ठं सा परागतिः ।” अव्यक्तापेक्षांहि परमात्मा श्रेष्ठ होय. त्यापेक्षा श्रेष्ठ असे काहीहि नाही. अशा तारतम्य भावाने विचार करून श्रुति म्हणते की ‘पुरुष एवेदं सर्वं । यद्भूतं यच्च भव्यम् ।।” हे सर्व पुरुषरूपच, त्रिकालांत उद्भवणारे सर्व काही परमात्मरूपच आहे असेंहि श्रुति म्हणते. परमात्म्यापासून काहीच वेगळे नसल्यामुळे सर्व कांही तोच आहे हे नि:संदिग्धपणे सिद्ध होते.

परमात्म्याचे स्वरूप प्रथम कसे होते? या प्रश्नाचे श्रुतींनी पुढील उत्तर दिले आहे – सुरुवातीस परमात्मा स्वयंप्रकाशित होता. त्यामुळे सुरवातीस केवळ ज्योतिस्वरूप, केवळ आनंदस्वरूप व निर्गुण निराकार असा तो होता. त्याने आपल्या मायेनें हिरण्यगर्भ होऊन कार्य करावयाच्या इच्छेनें व अनेकत्वाच्या आकांक्षेनें पंचमहाभूतांची निर्मिती केली व त्यापासून विविधरूपी विराट स्वरूप धारण केले.

या जगतांत पंचमहाभूतांनी निर्मिलेल्या वस्तु सृष्टि निर्मितीच्या पूर्वी परमात्मस्वरूपच होत्या. त्याच आता विभिन्न स्वरूपात दृग्गोचर होतात. सुरवातीस एकटाच असलेला परमात्मा आता मी पणाचा अंकित असून आपल्या इच्छेप्रमाणे एकामागून एक अशी असंख्य व अनंतरूप सृष्टि निर्माण करून तीत स्वतः व्यापून राहिला आहे. म्हणून कोणताहि जिन्नस पाहिला किंवा कोणासहि विचारले तर “सोऽह” शिवाय दुसरे काहीहि नाही. म्हणजेच सर्व परमात्मरूपच होय. बाह्यसृष्टीत परमात्म्याच्या संकल्पाप्रमाणे नाम, रूप, गुण,जाति इत्यादि भिन्न भिन्न दिसत असले तरी सर्व एक परमात्मरूपच होत.

“सोहमस्मीत्यग्रेव्या हरक्ततोऽहं नामाभवत् ।” भिन्न भिन्न स्वरूपापासून त्यास मी पणाची जाणीव झाली. त्यांत तोच तो अंतर्भूत आहे म्हणून कोणतेहि शरीर घेतल्यास त्याला ‘मी’ पणाची जाणीव असतेच. भिन्न भिन्न धारणेमुळे अनेकत्व भासमान होते. मी पणाची जाणीव सर्वामध्ये सर्वसाधारणपणे दिसून येते. एकरूप असलेल्या परमात्म्याने आपल्या संकल्पाने अनेक रूपं धारण करून ही सृष्टि निर्मिली हे स्पष्ट होते. अनेकत्व टिकविण्यासाठी परमात्म्याने भिन्न भिन्न रूप धारण केली आहेत. एकमेव असलेल्या परमात्म्याने पंचमहाभूतांची रूपे घेऊन अनेकत्व दाखविणारी नांवें व रूप धारण करून आपल्या अंशमात्र असलेल्या जगताची निर्मिती केली. अशा रीतीने आपली वेद, उपनिषदें, श्रुति, स्मृति यांनी परमात्म स्वरूपाचे वर्णन केले आहे.

या पंचमहाभूतांपासून मानव शरीराची निर्मिती झाली आहे. आकाशापासून वायू, वायूपासून अग्नि, अग्निपासून जल व जलापासून पृथ्वी, पृथ्वीपासून वनस्पति, वनस्पतिमुळे रेत व रेतापासून मानव असे एका मंत्रांत सांगितले आहे.

“तस्माद्वा एतस्मादात्मन आकाशः संभूतः। आकाशाद्वायुः। वायोरग्नि:। अग्नेरापः। अद्भ्यः पृथ्वी। पृथिव्याः ओषधयः। ओषधीभ्योऽन्न । अन्नात्पुरुषः। स वा एष पुरुषोऽन्नरसमयः ।।

आपण कोणालाहि दुरून हाक मारल्यास ‘ओ’ असे उत्तर येते. या ‘ओ’कारास प्रणव असें म्हणतात. या प्रणवाने ” मीच परब्रह्म आहे.” असें ज्ञान होते. प्रणवरूपी ओंकारच लोकांच्या तोंडात ‘ओ’कार रूपानें प्रणित झाला आहे. मी हेच मानवाचे पहिले नाव, “तस्य वाचकः प्रणवः” हाक मारल्यास “ओ” हे उत्तर मिळते. नंतर कोण? असा प्रश्न करतांच ‘मी’ असे उत्तर येते. मी या एकाच नावाने उत्पन्न झालेले आई, वडील, बंधु, भगिनी हे निरनिराळ्या संबंधाने वेगवेगळे होऊन निरनिराळ्या नावांनी संबोधिले जातात. या विवेचनामुळे मनुष्ये जशी सर्व एक तशी सृष्टीहि एकच आहे.

“तस्माच देवा बहुधा संप्रसूताः साध्या मनुष्याः पशवो बयासि। प्राणापानौ ब्रीहियवौ तपश्च श्रद्धा सत्यं ब्रह्मचर्य विधिश्च । सप्तप्राणाः प्रभवन्ति तस्मात्सप्तार्चिषः समिधः सप्त होमाः। सप्त इमे लोका एषु चरंति प्राणा गुहाशया निहिताः सप्त सप्त ।। अतः समुद्रागिरयश्च सर्वे स्मात्स्यदन्ते सिन्धवः सर्वरूपाः । अतश्च सर्वा ओषधयो रसश्च येनैषभूतैस्तिष्ठतेद्द्यांतरात्मा।”

या परमात्म्यापासून उत्पन्न झालेले देव देवता रूपानी, सिद्ध आदीनी, मनुष्यांनी, पशुपक्ष्यादीनी, प्राणापानादींनी, धान्य-वनस्पति औषधादीनी, तप, श्रद्धा-सत्य-ब्रह्मचर्यादीनी, अग्नि-होमद्रव्य-होमादींनी, भूर्भुवादि लोकांनी, समुद्र-पर्वत, नद्या म्हणजे यच्चयावत् सृष्टिकार्यरूपांनी एक परमात्माच आहे असें श्रुतिवाक्यांत सांगितले आहे.

अशा रीतीने परमात्म्याने प्रत्येक जीवांत ‘मी’ पणा जागृत केला व याच गतीने सर्व कार्य चालू आहे. परमात्मा ‘मी’ या संज्ञेने सर्व चराचरांत स्वत: विलीन झाला आहे. मानवदेहांत ‘मी’ पणाची जाणीव नसेल तर कोणतेच कार्य होणार नाही. मी पणाची जाणीव नसती तर तो एका जागीच पडून राहिला असता. अशाला हाक मारल्यावर त्याने ‘ओ’ हे उत्तर देणे अशक्यच. कारण मग तो अचेतन पदार्थासारखाच असणार. यावरून मी पणाची जाणीव नसलेला देह अचेतन, जड आहे हे उघड आहे. देहांतील मी पणाची जाणीव हेच चैतन्याचे अस्तित्व होय. ती जाणीव नसल्यास सर्व व्यवहारांत “माझे माझे” हे शब्द उत्पन्न होणार नाहीत. मी पहातों, मी करितों या शब्दांचा कर्ता कोण? जगांतील व्यवहारासाठी कोणत्यातरी कर्त्याची आवश्यकता असते. तो कर्ता म्हणजेच मी पणाची जाणीव व ही जाणीव म्हणजेच परमात्मस्वरूप.

प्रत्येक देहामध्ये असलेला मी म्हणजे कोण? याची जाणीव करून देणारा विचार म्हणजे अध्यात्मिक विचार होय. आत्मविवेक आपले बहुरूप, अगाध शक्ति, अगाध लीला दाखविण्यासाठी एकाच परमात्म्याने निरनिराळी रूपं धारण केली आहेत. निरनिराळया देहांत वेगवेगळया स्वरूपांनी असलेल्या अहंस्फूर्तीला एकत्र आणले तर काय होईल? निरनिराळया भांडयांतील पाणी एका मोठ्या भांड्यांत ओतले तर काय होईल? सर्व पाणीच, हेच सिद्ध होईल. त्याप्रमाणे सर्व देहांतील अहंस्फूर्ति एकत्र केल्यास ते परमात्मस्वरूपच असणार. अशा रीतीने निरनिराळी असलेली अहंस्फूर्ती एकत्र करून हिरण्यगर्भात प्रविष्ट केल्यास “एकोऽहं बहुस्याम” या श्रुतिवाक्याप्रमाणे मी एकच असून बहुरूपी झालो आहे असा हिरण्यगर्भाने संकल्प केला आहे. म्हणून त्याला “सर्वाहं मानी हिरण्यगर्भः” असे म्हटले आहे. तोच या सर्व मी पणाच्या जाणिवेस कारणीभूत आहे. म्हणजे मी पणाची स्फूर्ती हे सर्वाआधीचे परमात्मस्वरूप आहे. ही सर्व विभिन्न रूपें हिरण्यगर्भात एकत्रित केल्यास “बहुस्याम्” हा संकल्प जाऊन फक्त “एकोऽहं” शिल्लक राहील. म्हणजे बहुत्व नाहीसे होऊन एकत्व शिल्लक राहील. जगत्संकल्परहित असें जे निर्विकल्परूप तेंच ब्रह्म होय असें विवेकी मनुष्यानी पूर्ण विचार करून “अहं ब्रह्मास्मि” या वेदमहावाक्यांत ते ओळखिलें आहे.

एका महाज्योतीने असंख्य दिवे पेटविता येतात तद्वत जगाला प्रकाश देणाऱ्या महाज्योतिरूपी जो परमात्मा त्यापासून आपण उत्पन्न झालो आहों.
“यदात्म तत्त्वेनतु ब्रह्मतचं दीपोपमेनेहयुक्तः प्रपश्येत् । अजं ध्रुवं सर्वतत्वैर्विशुद्धं ज्ञात्वा देवं मुच्यते सर्वपापैः ॥”

अखंड ज्योतिस्वरूप असलेल्या आत्म्यास मी पणाची जाणीव होऊन निरनिराळया वस्तूंची इच्छा झाली. मी पणाची इच्छा नसती तर काहीच झाले नसते. आपल्यापासून उत्पन्न झालेल्या स्फूर्तीने एक, दोन, तीन अशा क्रमाने या अनंत सृष्टीची उत्पत्ति झाली’. एक असल्यावर दुसरे कसे उत्पन्न झाले? हा प्रश्न उद्भवल्यास आधुनिक प्राणिविज्ञानशास्त्रवेत्ते एकाचे तुकडे केल्यास दोन, दोनाचे चार व त्यांचे पुढे असंख्य तुकडे होतील असे म्हणतील हे कसे शक्य आहे? कारण एकच एक असतां स्त्री पुरुष ही निराळी उत्पत्ति या शास्त्राधारे होऊ शकेल काय ? “आत्मानमेव द्वेधापातवत्ततः। पतिश्च पत्नीचाभवताम् ।” म्हणजे पति पत्नि हे निरनिराळे दिसत असून त्यांचे मूळ एकच असतांना कामसंकल्पाने प्रेरित होऊन त्यांचे बहुरुपात रुपांतर होते. तोच
गृहस्थाश्रम होय. परमात्म्पाची सृष्टि हा एक विशाल गृहस्थाश्रम होय.

निर्विकार स्वरूपी एकच परमात्मा जाणणे म्हणजे संन्यासाश्रम होय. संन्याशास वेगळेपणा नसतो. सर्व विश्व एकच समजणारा संन्याशी होय. संन्याशी हा नित्य, निर्विकार अशा विश्वाला ‘सोऽहं’ असे म्हणत असतो. गृहस्थाश्रम सृष्टिसंकल्पयुक्त आहे. त्यामध्ये मी पणा आहे. पण संन्यासाश्रमात मी पणास जागा नाही. “प्रजाकामोवै प्रजापतिः स तपोऽतप्यत स तपस्तप्त्वा मिथुनमुत्पादयते । द्वेधा विमज चात्मानमर्ध्येन पुरुषोऽभवत् । अर्धेन नारी तस्यांतु विराजमसृजत्प्रभुः। मम योनिर्महदब्रह्म तस्मिन् गर्भ दधाम्यहं । संभव: सर्वभूतानां ततो भवति भारत ।” ही सर्व वाक्ये प्रवृत्तिदर्शक आहेत. मूळपुरुषाचा डावा भाग म्हणजे स्त्री व उजवा भाग म्हणजे पुरुष, म्हणजेच ते प्रकृति-पुरुष होत. त्यांनी प्रथम अव्यक्त असता नंतर व्यक्त स्वरूप धारण केले. प्रकृतीच्या गर्भात पिंडोत्पत्ती होऊन वाढत असतो तो अव्यक्त होता व जगद्रुपी बालकास जन्म दिल्यानंतर तो व्यक्त स्वरूप होतो. “गृहिणी गृहमुच्यते” असे गृहस्थाश्रमासंबंधी म्हटले जाते. गृहास कारण जशी गृहिणी त्याप्रमाणे जगतास प्रकृति कारण आहे. तीच परमात्म्याची सृष्टी आहे.

सृष्टीमध्ये वृष्टि व समष्टि असे दोन भाग असले तरी ते एकमेकांपासून भिन्न नाहीत. संसार म्हणजे समष्टि व त्यांतील व्यक्ती म्हणजे वृष्टि होय.

तत्वदृष्टीने विचार करून स्त्री पुरुषांनी परस्परांकडे आत्मरूपतेने पाहून व्यवहार केल्यास ते मोक्षपद प्राप्त करू शकतात. म्हणजेच एकरूप होऊ शकतात.

ज्याची जाणीव झाल्यावर इतर काहीहि जाणणे शिल्लक रहात नाही असें जें आत्मज्ञान आहे ते सर्व गोष्टींचा पाया आहे. ते जाणून घेण्यासाठी मानवाने प्रयत्नशील असले पाहिजे.

परमात्मसृष्टीकडे भिन्न व अभिन्न या दोन्ही दृष्टीने पहाणे शक्य आहे. परंतु या दृष्टींत कोणती दृष्टी तात्त्विक आहे याचा विचार करावा लागेल. उदाहरण द्यावयाचे झाल्यास स्त्री, पुरुष हे दोन्ही भिन्न आहेत परंतु दोषांचा निर्माता अभिन्न आहे. एकापासून दोन दिसत असले तरी विचारांती ते एकच आहेत असें लक्षात येईल. भिन्नत्वास प्राधान्य दिल्यास देहाला महत्त्व दिल्यासारखे होईल. अशा रीतीने देहाला महत्त्व दिल्यानंतर त्या देहांतील “मी” निघून गेल्यावर त्या शवास महत्व असावयास हवे. म्हणजेच शवाला वाचा असणें अवश्य आहे. त्यास हाक मारतांच त्याने “ओ” दिली पाहिजे. पण असे होत नाही. यावरून भिन्न असलेले स्त्री, पुरुष यांच्या शरीरास महत्व देण्याचे कारण नाही. आत्म्याला किंवा शरीर स्थित “मी” यालाच महत्व आहे. आत्मा अभिन्न आहे. अनेक असले तरी तें अभिन्नच. शरीरें निरनिराळी दिसत असली तरी त्यांतील चैतन्य हे अभिन्नच असते. अनेक शरीरात दृग्गोचर होणारे चैतन्य एकच आहे.

शरीरापासून शरीरोत्पत्ति आहे. उत्पन्न झालेले शरीर अन्नामुळे पोसले जातें. अन्न नसल्यास शरीर टिकणार नाही. अन्नाचे परिणामस्वरूप असलेल्या रज, रेत यापासूनच शरीरोत्पत्ति होत असते. शरीरास अन्नच कारणीभूत आहे. अन्नामध्ये स्त्री, पुरुष असा भेद नाही. अशा रीतीने विचार केल्यास दृश्य शरीरांची भेदबुद्धि ही निव्वळ स्वप्नसृष्टी होय. अन्नामुळे स्त्री- शरीरांत उत्पन्न होणारे रक्तमांसादि सप्त धातुच पुरुष शरीरांतहि उत्पन्न होतात. असें असल्याने पुरुषांत स्त्री देहाचा मोह व स्त्रीला पुरुष देहाची इच्छा हे भेदभाव हे केवळ भ्रममूलच आहेत. या मिथ्या कल्पनेपासून विरक्त झालेल्या ज्ञानी मनुष्यांस स्त्री-पुरुष देहांमधील भेदभाव
वाटत नाहीत. त्या देहामध्ये ब्रह्मरूप असलेला आत्मा एकच आहे हेच माहित असते.
जगांत उत्पन्न झालेले विविध भिन्न भाव, उन्नति-अवनति, सुख-दुःख, शीत-उष्ण, लाभ-हानि, ही द्वंद्वे परमात्म्यानेच आपल्या इच्छेनें उत्पन्न केली आहेत. नाटकांत ज्याप्रमाणे भिन्न-भिन्न पात्रे निरनिराळया भावना म्हणजेच सुख-दुःख, भ्रम-हास्य इत्यादि रस दाखवितात, त्याचप्रमाणे विश्वांतहि नाटक चालू असते. नाटकांत काम करणारा मनुष्य दुःखाचा अभिनय करून प्रेक्षकांना दु:खांत लोटतो. परंतु तो स्वतः आतून जागृत असतो. दुःखित झालेल्या प्रेक्षकांना तो आत्मसात करू शकत नाही. प्रेक्षकांचे मन रसग्रहणाने उल्हसित होते त्यामुळे “ वन्स मोअर” असे म्हणून ते दुःखाभिनय करणाऱ्या पात्रास पुनः जोराने अभिनय करावयास लावतात.
जगतरूपी नाटकांत अनेक पात्र अनेक रसांचा अभिनय करीत असतांना त्यांतील खरे असलेले परमात्मस्वरूप जाणणे हेच योग्य ठरते. याकरितांच आत्मज्ञानाची आवश्यकता असते.

या विश्वरूपी पडद्यावर आपल्या संकल्पाने निरनिराळी चित्रे रंगवून परमात्मा चलचित्ररूपी नाटक दाखवितो. विवेकी मनुष्य यांतील सुखदुःखाचा भागीदार होत नाही. उत्पन्न केलेली अनेक दृश्य व निरनिराळया लोकव्यवहारांतून आपली करमणूक व्हावी म्हणूनच हे चलचित्र परमात्म्याने आपल्या कल्पनेने निर्मिले आहे. ती चित्रे पाहून आपण हुरळून जावू नये किंवा कष्टीहि होऊ नये.

स्वयंप्रकाशी असलेल्या दिव्य ज्ञानरूपी परमात्म्याने आपल्या संकल्पाने नाना प्रकारचे विलास उत्पन्न केले तेच हे जग होय.

समुद्रावर दिसणाऱ्या लाटा असंख्य व अपरिमित असल्या तरी त्यांत असलेले पाणी एकच असते. तसेच या सृष्टीत असलेली भिन्न भिन्न कृति अनेकरूप असली तरी त्यांतील नित्य, निविकार असलेले परमात्मस्वरूप एकच आहे असें जो ओळखतो तोच आत्मज्ञानी होय. असा आत्मज्ञानी मनुष्य सदासर्वदा जगत् व्यवहारामध्ये निर्विकार चित्त असतो. त्याला दुःखहि नसते व तापत्रयांचा त्रासहि नसतो.

वर्णाश्रमधर्मपालनांत आपणांस परमात्म्याचे भिन्न भिन्न व्यवहार दृष्टीस पडतात. सर्व वर्णातील सर्व लोकांना मी पणाची जाणीव असतेच असते. तसेंच ब्रह्मचर्यादि आश्रम पाळतांनाहि मी पणाची जाणीव असते. यावरून सृष्टीत भिन्नत्व असले तरी तींत एकत्व समाविष्ट झाले आहे असे ज्ञानी ओळखतात. परमात्माच भिन्न भिन्न वर्णाश्रम निर्माण करून त्या सर्वांचा सांभाळ करतो. हे सर्व नाटक चालू असता किंवा संपल्यावरहि तत्त्वत: शिल्लक राहणारे एकमेव सच्चिदानंद स्वरूपच होय.

जगाप्रमाणे मनुष्य देहांतहि मनोबुध्यादि व प्राणेंद्रियादिमुळे अनेकत्व आहे. डोळे पाहतात, कान ऐकतात, नाक वास घेतें याप्रमाणे त्यांची कामेंहि भिन्न आहेत. ती एकरूपी असती तर अशी निरनिराळी कामे होऊ शकली नसती व मग शरीर व्यवहार होऊ शकला नसता. कारण एकत्वात भिन्नत्व असूं शकत नाही. मन व देहांतील इंद्रियांची रूपे भिन्न असून त्यांची निरनिराळी कामें आहेत. कानाप्रमाणे डोळे नाहीत. डोळ्याप्रमाणे नाक नाही. कानाचे काम डोळे करू शकणार नाहीत, त्याप्रमाणे डोळयाचे काम कान करूं शकणार नाहीत व या दोन्हींची कामें नाक करूं शकणार नाही. अशा रीतीने सर्व इंद्रिये एकमेकांशी भिन्न असून त्यांची कामेंहि भिन्न आहेत. पण या सर्व अवयवांचे, त्यांच्या कार्याचे व देहाचे मूळ कोण? या सर्वांमध्ये व्यापून राहिलेले काय आहे? असे प्रश्न केल्यास त्याला मूलभूत कारण ‘मी’ म्हणजेच चैतन्य हे एकच आहे. म्हणून सर्व इंद्रियांचा प्रेरकहि चैतन्यच नव्हे का? अशाप्रमाणे निरनिराळी काम चालली नाहीं तर शरीरकार्य कसे होणार ?

मानव देहरूपी अंश सृष्टिकार्याच्या विवेचनाने अखंड सृष्टिकार्य विवेचन आपोआप झाले. उदाहरणार्थ- एका राज्यांत अनेक विभाग, अनेक अधिकारी व अनेक कारकून असतात. ते सर्व आपापली कामें करीत अतात. परंतु त्या सर्वांच्या कार्याचा उद्देश एकच असतो व त्या सर्वांना प्रेरक असा एकटा राजाच असतो. ते त्याच्या आशेनें कार्य करीत असतात. तो राजा राज्यरक्षणाच्या एकमेव उद्देशाने प्रेरित होऊन त्या सर्वाना कामें वाटून देतो. त्याचप्रमाणे सृष्टिकर्ता आपल्या इच्छेप्रमाणे अगांतील सर्व व्यवहार चालवीत असतो. असे असल्यामुळे जगातील सर्व व्यवहार मिथ्या आहेत असे कसे म्हणता येईल? तसेच ते सर्व सत्य- (नित्य) आहेत असें समजणेहि चूकच. यामुळे कोणता निर्णय घ्यावयाचा अशी शंका निर्माण होते. जगातील सर्व व्यवहार एकत्व संपादण्यासाठी होत असतात. सर्व गुमास्त्यांची भिन्न भिन्न कामें असली तरी ती एकाच उद्देशाने प्रेरित असतात. त्याप्रमाणे जगातील सर्व व्यवहार एकत्व साधनेसाठी आहेत. असें उमजून घेतल्यास मिथ्या व सत्य यांची गुंतागुंत नाहींशी होईल. सकल प्राणिमात्रांमध्ये परमात्मा मी रूपाने असतोच; हे सत्य जाणून निवृत्ति वा प्रवृत्तिमार्गाने योग्य जगव्यवहार केला पाहिजे. निरनिराळी कर्तव्यकर्मे करीत असता त्या सर्वांचं एकमात्र-एकमेव स्वरूप विचारता येणार नाही. जगरूपी नाटकात निरनिराळ्या भूमिका, निरनिराळी पात्रे संदर्भानुरूप करीत असतात. त्यावेळेस अनुभवास येणारी सुखदुःखें भासमान आहेत म्हणजेच मिथ्या आहेत हे न विसरल्यास सत्यत्वाचे दर्शन घडेल.

मानव कोणत्याहि वर्ण वा आश्रमांतील असो, ज्याने त्याने आपणांसाठी असलेली शास्त्रविहित कर्मे निष्ठेने केली पाहिजेत. स्वधर्म परिपालन, गुरुसेवा, स्वस्वरूप मनन, पूर्णभक्ति, परमात्म्याच्या ठिकाणी अनन्यता, वैराग्य यांचे आचरण करीत राहिल्यास तो मोक्षाधिकारी होऊन मुक्त होतो.

अशाश्वत असलेल्या जगव्यवहारांत मी पणाची जाणीव, जागृति, स्वप्न, सुषुप्ति, भूत, वर्तमान, भविष्य यामध्ये असतेच असते. ती जाणीव असल्याने हे सर्व जग परमात्मसंकल्पाची माया आहे हे उघड ठरते व त्यामुळे कल्पनेने हे सर्व जग, मानव देह, यांची कामें ही सर्व मिथ्या आहेत अशी जाणीव करून घेऊन आत्मनिष्ठ होणे हेच आत्मज्ञान होय.

या नश्वर देहास बाहेरून सजविण्यासाठी निरनिराळे अलंकार घातले, निरनिराळ्या प्रकारची उटणी, साबू यांनी स्वच्छ व सुवासिक करण्याचा प्रयत्न केला तरी त्या देहांतील आत्म्यास त्याचा काहीहि उपयोग नसतो. त्याला सुगंध किंवा दुर्गंध याचेहि काही वाटत नसते. जसें ताप आलेल्या मनुष्याचा कुपथ्य केल्याने रोग वाढतो तसा शृंगार हा विषयवासनायुक्त मनुष्यास अधोगतीस नेण्यास पात्र होतो. क्षयी मनुष्याला शृंगार चढविल्यास त्याची व्यथा कमी होईल काय? त्यासाठी औषध व पथ्य याचीच आवश्यकता असते. बाह्यवेषभूषेनें शरीरांत आत्म्याची कल्पना होणार नाही व आत्म्यावर संस्कारहि होणार नाहीत.

इंद्रिये मनुष्यदेहास सुखप्राप्ती करण्यासाठी जितके प्रयत्न करतात तितका तो देह नित्कृष्ठावस्थेत पोहोचतो. रोग्यास औषधोपचार न करिता, पथ्यापथ्याचा विचार न करिता वाटेल तसे खाण्यापिण्यास दिले तर तो बरा होईल काय? त्याप्रमाणे प्रापंचिक सुखासाठी मनमानेल तसे वागणाऱ्या मनुष्यास दिनप्रतिदिन, क्षणागणिक अधोगतीच प्राप्त होत असते.

म्हणूनच जग मिथ्या, जगांतील व्यवहारहि मिथ्या असून ते नाटकांतील भावावेशाप्रमाणेच होत, अशी जाणीव करून घेऊन आत्मनिष्ट होऊन, सूक्ष्मरितीने आत्मस्वरूप जाणून आत्मज्ञानी होण्यासाठी धडपड केली पाहिजे. असत्य, अरुचि, विकृति, दुर्गंध यांनी युक्त असलेल्या या जगांत सत्य, सुरुचि, सुगंध, सौन्दर्य कोठून असणार ? म्हणून मी पणाच्या जगद्व्यापी जाणीवेने परममंगल आनंदरूप, परिशुद्ध अशा परमात्म्याचे स्मरण करा. बाह्य शरीर म्हणजेच मी ही भावना विसरून जा. या तुच्छ शरीरांत सुखसौन्दर्य भावनेस मुळीच वाव देवू नका. परमात्मरूपी दिव्यसुख म्हणजेच माझे सुख व परब्रह्म म्हणजेच मी या विशाल दृष्टीने विचार करा !!

मी आपणास तीर्थ, मंत्राक्षता, भस्म देतो तें काय आहे? तर हे सर्व परमात्म्याची जाणीव होण्याकरिता आपणासाठी योग्य औषधोपचारच आहे. तुम्ही प्रपंचात व्याप-तापानी, व्याधींनी ग्रस्त झाला आहात. त्या रोगनिवारणेसाठी ही टोचणी आहे. हे सर्व विचार मी समजून घेतले असून तुम्हीहि समजवून घ्या !! तुमची भवव्याधि नष्ट होवो !! तुम्ही सर्व सुखी होऊन सुखरूप व्हा !! त्या सुखाची तृप्ती आपल्या सर्व व्यवहारात उत्तमरीतीने दृष्टोत्पत्तीस पड़ो!!

home-last-sec-img