Literature

आत्मानुसंधान-साधनप्रतिष्ठा

अनित्याशुचिदुःखानात्मसु-नित्यशुचिसुखात्मख्यातिरविद्या | (पां. यो. सू. सा.पा. ५). अनित्य, अशुचि, दुःख, अनात्मरूप स्वपरदेहाच्या ठिकाणी नित्य,शुचिसुख, आत्मरूप केवळ अविद्येमुळे वाटते. म्हणून कामादि विकार, देहसौख्याची कल्पना, परदेहाचा मोह व स्वदेहाचा अभिमान निःस्पृहानें जिंकावा. ‘निर्वेदमायात् ।वैराग्य धारण करावें. नास्त्यकृतः कृतेन । नित्य आत्मसुख केव्हांहि अनित्य पदार्थापासून मिळत नाही, असे कठोपनिषदांत आले आहे ते लक्षात ठेवावें. (मुं. उ. १-२-१२). ‘सत्येन लभ्यस्तपसा ह्येष आत्मा सम्यग्ज्ञानेन ब्रह्मचर्येण नित्यम् ।‘

अन्तःशरीरे ज्योतिर्मयो हि शुभ्रो यं पश्यन्ति यतयः क्षीणदोषाः ॥ (मुं. उ. ३-१-५). हा आत्मा नित्यसत्याने आपले मी हे भान आनंदरूपांत विलीन करून निर्विकल्प रहाण्याच्या नित्य तपानें अथवा तत्साधनरूप श्रवणमनन निधिध्यासानें यथार्थ म्हणजे मी निर्गुण, निराकार, अद्वय, चिदानंदरूप आहेअशा रीतीने स्वतःला नित्य पहाण्याने व नित्यः ब्रह्मचर्य राखण्याने ज्याचा अनुभव संन्यासी घेतात आणि जो देहात शुभ्र ज्योतिरूप आहे त्या आत्म्याची प्राप्ति होते, असे मुडकांत आले आहे. यात आलेल्या आत्मसाक्षात्काराला कारणीभूत होणाऱ्या  साधनाकडे निःस्पृहानें लक्ष द्यावें ब्रह्मचर्येण ह्येव सत आत्मनस्त्राणं विंदते।” ब्रह्मचर्यपालनानें परमात्म्याचे रक्षण लाभतें; त्याचा लाभ होतो. * तद्ब्रह्मचर्येण ह्येवात्मानमनुविद्य मनुते ॥ ब्रह्मचर्याच्या बळाने आत्मस्वरूप जाणून त्याची धारणा साधक साधतो, असें छांदोग्यां तहि आले आहे. (छां. उ. ८-२-५), आनंदमयोऽभ्यासात् ।‘ (ब्र. सू. अ. १. पा. १ अ. ६ सू. १२) आनंदात्मा प्रियो ह्यात्मा ।‘ मी मला सर्वाधिक प्रिय असणारा आनंदरूप आत्मा आहे, असा सतत अभ्यास करण्याविषयीं ब्रह्मसूत्र आणि श्रुति यांचे सांगणे आहे. आनंदाद्ध्येव खल्विमानि भूतानि जायन्ते आनंदेन जातानि जीवन्ति । आनंदं प्रयन्त्यभिसविशन्ति ॥ (तै. भृगु. व. अ. ६). एका आनंदापासूनच सर्वहि भूतजात निर्माण होते. उत्पन्न झालेले सर्वहि त्या आनंदानेच एक जगते, त्या आपल्या मूळ स्वरूपांत एकरूप होण्याकरितां त्या आनंदाकडेच धांव घेते आणि त्यांतच ते अंती समरसून जाते. अशी श्रुति असल्यामुळे आनंदस्वरूपाची धारणा सर्वश्रेष्ठ आहे; आणि तोच आनंद आपल्याला

पाहिजे आहे. सत्ता स्फुरत्ता परमात्मनो या नाच्छादतीया ह्युपजीव्यभावात् । आनंद आच्छादयतीव माया तन्नाशने तत्वमसीति वाक्यम् ॥ अस्तित्व आणि जाणीव यांचा तिला आधार असल्यामुळे माया त्यांना झांकू शकत नाही आणि झांकीतहि नाही, परमात्म्याचा आनंद मात्र झांकते. ते आवरण गेले आणि आनंदाचा साक्षात्कार झाला म्हणजे तत्त्वमसिहे महावाकय फळले म्हणून समजावें.

शुभ्र शुक्ल हे वर्ण आत्मरूपाच्या अथवा ब्रह्मरूपाच्या वर्णनांत फार येतात. “शुक्लध्यानपरायणाः असे संन्याशा चें वर्णन आहे. शुक्लतेजोमयं ब्रह्म असे अद्वयतारकोपनिषदांत आले आहे. ” सा हि सोमकला सूक्ष्मा तद्विष्णोः परमं पदम् ॥ ” अशी बरीच वाक्यें आहेत. शुभ्र शुक्ल याचा अर्थ मायासंगश्युन्य अत्यंत पवित्र, परिशुद्ध असा केला असला तरी, परिब्रह्म हें नसे पीत ना श्वेत ना श्याम काहींया वर्णनाचे असले तरी, “अहं” स्फूर्तीचा लय करूनच निर्विकल्प ब्रह्मध्यानाचा अभ्यास असला तरी प्रथम प्रथम तेवढे नच साधलें तर चंद्रप्रकाशासारखे आनंद रूप आहे म्हणून घ्यावे. आत्मसाक्षात्कारानंतरचा अनुभव आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर येतोच. ‘तच्चिंतनं तत्कथनमन्योन्यं तद्प्रबोधनम् । एतदेकपरत्वं च ब्रह्माभ्यासो विदुर्बुधः।‘ त्याचेच चिंतन करणें, परस्परांत युक्तिप्रयुक्तीने त्याचाच विचार विवरण  करणें, उत्तेजन देणें, तात्पर्य, तंदेकपरता ब्रह्माभ्यास म्हणवून घेतो. सदैव मी ज्ञेयशून्य ज्ञानमात्र आहे. या मद्व्यतिरिक्त कुठे कशांतहि खरे आणि श्रेष्ठ सुख नाही या समाधानाने व निश्चयाने असावें. अभेददर्शनं ज्ञानं ध्यानं निर्विषयं मनः । स्नानं मनो मलत्यागः शौचमिंद्रियनिग्रहः । ब्रह्मामृतं पिबेद्भैक्षमाचरद्देहरक्षणे । वसेदेकान्तिको भूत्वा चैकान्ते द्वैतवर्जिते । इत्येवामाचरेद्धीमान् स एवं मुक्तिमाप्नुयात् ॥ (स्क. उ. ११-१२). त्या आनंदघन परब्रह्माशी सदैव अभिन्न असणे आणि आपल्या अद्वितीय स्वरूपाचे भानच सर्वत्र पसरले आहे अशा निश्चयाने सर्वांनाहि अभिन्न पहाणे हे ज्ञान. आनंदस्वरूपाच्या धारणेने मन निर्विषय करणे, विषयासक्तिशून्य करणे अथवा आनंदस्वरूपाहून अन्य कोणतेंहि मनाचा विषय होऊ न देणे, कशाचीहि कल्पना मनात न स्फुरु देणें हें ध्यान. मनाच्या कलुषित वैषयिक भावना धुऊन काढणे, देह-इंद्रियांच्या भावना अजिबात नष्ट करणे हे स्नान, मन इंद्रियांना त्यांच्या त्यांच्या विषयापासून परावृत्त करून त्या सर्वांना आपल्या आनंदघनरूपांतच विलीन करणें ही शुद्धता, शौच. स्वरूप म्हणून एक आनंदाचीच तदभिन्न असणारी निर्विकल्प जाणीव उरविणें, निर्विषय आनंद आपणच होणे हेच भोजन. सदैव द्वैतदविजित असणे हा अखंड एकान्तवास. हे जाणून जो असा अभ्यास करतो त्याला हटकून मोक्षाची प्राप्ति होते. सदोदित अशा निर्गुण आत्मनिष्ठेत रहाणे शक्य नाही झाले तर उपासनेची अथवा सद्गुरूची मूर्ति चंद्रप्रकाशासारख्या आनंदाच्या प्रकाशात आठवून त्याने ती घडली आहे असे मानून घ्यावें. मुखावर प्रकटलेल्या हास्यांतल्या आनंदांत मन विलीन करून दुसरे काहीं न आठवितां रहावे आणि तेंच आपले आणि उपासनेचे शुद्ध सच्चिदानंद ब्रह्मरूप मानावे. यथाभिमतध्यानाद्वा ।‘ असे एक सूत्र आहे. पातञ्जल (यो. सू. स. पा. ३९). कांही वेळ आत्म स्वरूपाची लक्षणे आठवून त्या लक्षणांच्या अनुसंधानाने आत्मध्यानपरायण व्हावे. काही वेळ ग्रंथावलोकन अथवा निरूपण अथवा श्रवण अथवा मनन करावें. उपासना मूर्ति ध्यानी । अथवा आत्मानुसंधानी । नाहीं तरी श्रवण मननी । निरंतर ॥ (दा. १४-७-१६).

home-last-sec-img