‘तो जीतचि असता मेला । मरणास मारून ज्याला । जन्ममृत्य न स्मरे त्याला । विवेकबळे ।। (दा. ७-१०-३०) असेच कठरुद्रोपनिषदाचे एक वाक्य आहे: स्वयं मृत्वा स्वयं भूत्वा स्वयमेवावशिष्यते । (क. रु. उ. ४३) या परमार्थात, मेलेल्या माणसांचा जसा देहाशी काही संबंध नसतो, त्याप्रमाणे देहाचा संबंध न बाळगता देहाभिमान आणि संबंध घालवून म्हणजे मरून मग आत्मनिश्चयाचा नवा जन्म घेऊन आपल्या एका ज्ञानमात्र अथवा ज्ञप्तिमात्र आनंदाहून दुसरे काहीच नाही असे ओळखून आपणच एक उरून निःस्पृहांनी समाधियोगाचे साधन करावयाचे असते. मी श्रीबद्रीनारायणाला गेलो असता तिथल्या साधकांचा योग्यक्षेम विचारण्याकरितां कसे काय ? सर्व बरें आहे ना ? ठीक चाललें आहे ना ? कसला त्रास अथवा काही कमी नाहीं ना ?” म्हणून चौकशी केली असता ‘ हम सब मुडदे बन कर साधन कर रहें हे।‘ असे त्यांनी उत्तर दिले. मीहि तशाच भूमिकेतून गेलो असल्यामुळे त्याचा मला अर्थ लागला. शवाला सुख-दुःख, काम-क्रोध, मान-अपमान, देहाच्या कोणत्याहि कष्टाचें परिज्ञान जसे नसते, त्याप्रमाणेच निःस्पृहाने रहावें. कशाकडे आणि कोणाकडे न बघता कसलाहि विचार मनांत न आणतां केवळ शवासारखे सहनशील व बाह्यविचार शून्य होऊन निःस्पृहांनी साधन करावयाचे असतें.
क्रियासिद्धिः सत्त्वे भवति महतां नोपकरणे ।‘ बाह्य उपकरणांच्या अनुकूलतेनें आजपर्यंतच्या निःस्पृह साधकांना परमार्थ साधला, असे नसून केवळ एक त्यांच्या सत्त्वबळानेंच साधला .हें अगदी न खोडता येणारें निर्भेळ सत्य आहे. ‘मागें ज्ञानी होऊन गेले । तेंहि बहुत कष्ट केले । तरी मग विख्यात जहाले । भूमंडळीं ॥ ‘(दा. १२-७-१०) त्यांना विघ्ने कमी आली नाहीत. विघ्नैः पुनः पुनरपि प्रतिहन्यमानाः । प्रारब्ध मुत्तमजना न परित्यजन्ति ।‘ हेंच खरें. विघ्नांच्या गारांचा पाऊसच त्यांच्यावर पडत होता तरी प्रारंभिलेलें तडीस नेल्या शिवाय सोडावयाचे नाही, असा त्यांचा निर्धार होता. देहं वा पातयामि अर्थं वा साधयामि । हा उत्तम पुरुषांचा बाणा असतो व त्यामुळेच केवळ सर्व सहन करून पुढे ते सिद्ध झाले. ‘यशाचा मार्ग दुःख-संकटांच्या खाईतून गेलेला असतो‘ असे उद्गार राज्यादि ऐहिक ध्येयपूर्तीकरितां झटणाऱ्याच्या तोंडूनहि निघतात; तर मग अशा ध्येयाच्यापेक्षांहि कोटि गुणें विचार म्हणून ज्या परमार्थाविषयों समर्थांनी सांगितले. त्या परमार्थात कशी मोठमोठाली किती विघ्ने येत असतील याची कल्पना करावी तितकी थोडी आहे. जितके ध्येय मोठे तितके कष्ट अधिक, या दृष्टीने ज्याच्याहून काही मोठेच नाही, त्या सर्वाति शय परमार्थाचे ध्येय बाळगणाऱ्याला किती कष्ट होत असतील, हे सांगता येत नाही. ‘यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह हें आत्मरूपाचें लक्षण इथेंहि लागू पडते. हा धकाधकीचा मामला ‘ असतो. विघ्न-दुःख-संकटे यांच्या गर्दीतून, या सर्वांना धक्के देऊनच आपल्या बळाने इथे मार्ग काढीत पुढे जावयाचे असते कोणी कोणाला सुखासुखी मार्ग मोकळा करून देत नाहीं. म्हणजे
आपल्यापुढं जाऊं देत नाही. आपल्यापेक्षा याचे बळ अधिक आहे. हे ओळखून हरूनच त्याला पुढे जाऊं देतो. हाच न्याय इथेंहि आहे विघ्न करण्याकरिता जे म्हणून येतील ते कितीहि मोठे असोत, कोणालाच दाद न देता सर्वांनाच हरवून, मागे टाकून निःस्पृहांनी पुढे जावयाचे असते.