Literature

आर्यांची जीवनदिशा

स्वस्ति पन्थामनुचरेम । आपण सर्वत्र श्रुतिप्रतिपादित अशा सन्मार्गानेंच जाऊं या. ऋतस्य पन्था न तरांति दुष्कृतः । (ऋ. ९/७३।६ ) – दुर्मार्गी व दुष्कर्मी सत्याला, सत्कीर्तीला, सन्मार्गाला व इहपर सुखालाहि आंचवतात ( म्हणून आम्ही दुर्भार्गी होऊं नये, दुष्कर्म करूं नये.) देवानां सव्यमुपसेदिमा वयम् । (ऋ. १।८९/२) आम्ही देवाचें सख्य संपादावें.

न ऋते श्रान्तस्य सख्याय देवाः (ऋ. ४।३३।११ ) परिश्रम केल्याशिवाय देवाची मैत्री होत नाहीं, देवांचे साहाय्य लाभत नाहीं. न देवानामतिव्रतं शतात्मा च न जीवति । देवतांप्रीत्यर्थ यागहवनादि सत्कर्म न करतां, त्यांची स्थळे पवित्र पावन न राखतां, तेथील विनियोग योग्य प्रकारें न चालवितां, नास्तिकपणानें देवदेवतांचे नियम मोडून, देवताविषयक कर्म न करून जो देवद्रोही होतो त्याचे आयुष्य क्षीण होतें. शंभर वर्षांचे आयुष्य असले तरी त्या दोषानें, थोड्याच काळांत तो मरण पावतो, म्हणून देवताविषयक द्रोहास पात्र होऊं नये. स्थिरैरंगैस्तुष्टुवा सस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः । (यजु. २५-२१) – सबल इंद्रियांनी व धष्टपुष्ट शरीरांनी आम्हीं ज्यामुळे देवांना आनंद होईल अशी शुद्ध पवित्र सत्कर्मे करीत देवांना हितावह होईल असें दिव्य जीवन चालवावें. अदीनाः स्याम शरदः शतम् । ( यजु. ३६-२४) देवतांचे सर्व नियम पाळून आम्ही शंभर वर्षेपर्यंत कसलेंहि दैन्य नसतां सुखानें जगावें. अयज्ञियो इत वर्चा भवति । ( अथर्व . १२।२।३) यज्ञहीन मनुष्य तेजोहीन होतो. वयं देवानां सुमतौ स्याम । ( अथर्व ६-४७-२ ) आम्ही देवांच्या मंगलमय उपदेशाप्रमाणे वागावें. वयं सर्वेषु यशसः स्याम (अथर्व. ६।५८/२) सर्व सत्कार्यांत आम्हांला यश प्राप्त व्हावें, धर्मप्रचारार्थ गेलों असतां सर्व जगांत आम्ही यशस्वी व्हावें. मानो विक्षत कश्चन । (अथर्व. १२।१।२४) आमचा कोणीहि द्वेष करूं नये. आरोहणमाक्रमणं जीवतो जीवतोऽयनम् । वर चढणे आणि पुढे जाणें प्रत्येक जिवंत मनुष्याचे ‘लक्ष्य’ (ध्येय ) असतेंच. सर्वान् पथो अनृणा आक्षियेम । ( अथर्व. ६।११७/३ ) यज्ञयागांनी देवऋणा पासून, वेदाध्ययनानें ऋषिऋणापासून व सुपुत्रप्राप्तीनें पितृऋणापासून मुक्त होऊन, सकल सन्मार्गांनी आम्हीं जावें. परैतु मृत्यु इमृतं नपतु ॥ (अथर्व. १८।३।६२) आमचा मृत्यु टळून आम्हांला अमृतत्वाची प्राप्ति व्हावी. सर्वमेव शमस्तु नः । (अथर्व. १९।९।१४) आमच्या बाबतीत सर्वहि मंगलप्रद कल्याणकारी होवो. यावरून आर्यांची जीवनदिशा उमगते.

home-last-sec-img