Literature

आर्य

यवं वृकेणाश्विना वपन्तेषं मनुषाय दस्त्रा। अभिदस्युं बकुरेणा धमन्तोरुज्योतिश्चक्रथुरार्याय (ऋ. १-११७-२१) यवमिव वृकेणाश्विनौ निवपन्तौ वृको लांगलं भवति । वितर्कनात् । लांगलं लंगते: । लांगू लवद्वा। लांगूलं लगतेलंगतेर्लेबतेर्वा l अन्नं दुहतौ मनुष्याय दर्शनीयाव भिधमन्तौ दस्युं बकुरेण ज्योतिषा वोदकेन वाऽऽयं ईश्वरपुत्रः || (निरुक्त ६-५-२६). या मंत्रांत आर्य शब्द आला आहे. या मंत्रांत अश्विनीकुमारांची स्तुतिहि आली आहे. ‘तुम्ही द्यूलोकांतील देवता आहांत शेतकरी नांगरांनी जमीन नांगरून जसे धान्य पेरतात व झालेल्या पिकांनी-धान्यांनी समाजाला जसा अन्नाचा पुरवठा करतात, अन्नदानाने जसा समाज तृप्त करतात, त्याप्रमाणेच तुम्ही अश्विनी कुमार सूर्याकडून झालेल्या पर्जन्यवर्षावाने आमच्या पुत्रपौत्रांना, पितृपितामहांना अखिल सुखसौकर्याचा पुरवठा करतो तृप्त करतो. दिलेल्या अर्ध्याने व केलेल्या तर्पणानें देवपितृगण तृप्त होतात. ते जल त्यांच अन्न बनते. हे अतिसुंदर असणाऱ्या अधिनीकुमारांनो तुम्ही सूर्यद्वारें पर्जन्याची वृष्टि करून मनुष्यांकरितांहि अन्नाची समृद्धि करतां, दुर्भिक्ष दुष्काळ नष्ट करता. आर्य ईश्वरपुत्राला विस्तृत दृश्य पाहण्यास डोळे दिलेत, पुन्हां दृष्टि आणलीत.’ निरक्ताच्या आधारे असा हा या मंत्राचा भावार्थ होतो. ईश्वरपुत्र म्हणजे ईश्वर या नांवाच्या ऋषांचा पुत्र. भुकेच्या वेळी रुईचे दूध पिऊन याचे डोळे गेले. गुरुघरच्या गाई कोठे गेल्या म्हणून पाहात असतां अकस्मात हा एका विहिरीत पडला. याचा शोध करीत याचे गुरु जवळ येऊन ठेपले. डोळे गेलेले पाहून त्यांनी त्याला अधिनमंत्राचा उपदेश दिला. अश्विनी मंत्रांनी त्याला पुन्हां दृष्टि आली. धौम्य ऋषिच याचे गुरु होत. यांच्या या शिष्याचें नांव उपमन्यु असे होते. केवळ आशीर्वादानेच आपल्या शिष्यांना वेदशास्त्रसंपन्न करण्याबद्दलची यांची ख्याति प्रसिध्द आहे. ही कथा महाभारतांत आली आहे. सातारा जिल्ह्यांतील वाईजवळ धोम म्हणून एक प्रसिध्द गांव आहे. हे या धौम्यऋषींचे एक आश्रमस्थान म्हणून ओळखले जाते. धौम्यमुनींचा आश्रम या ठिकाणी असल्यामुळेच याला धोम असे नांव पडले. गुरुसेवेनें सकल विद्येची प्राप्ति होते हे तत्त्व यांच्या आश्रमांत संपूर्णतया साकार झालेले दिसून येत होते. आदिमहाकाव्य म्हणून प्रसिद्ध असलेल्या वाल्मीकि रामायणांतहि आर्य हा शब्द पुष्कळ ठिकाणी आला आहे. आर्यः सर्वसमश्चैव सदैव प्रियदर्शनः । स च सर्वगुणोपेतः कौसल्यानंदवर्धनः ॥ वा. रा. बा. स. १-१६, १७) सुखिनी कच्चिदार्या च देवी नंदति कैकयी || (वा. रा. अ. स. १०० १०). आर्यपुत्र पितामाता

*(वा. रा. अयो. स. २७-३) व्रतामार्ये: सहस्रशः । इत्यादि. आर्य हैं। संबोधन काव्य, नाटकें इत्यादिकांतून पुष्कळ दिसून येते.

आर्यः सर्वसमञ्चैव सदैव प्रियदर्शनः । स च सर्वगुणोपेतः कौसल्यानंदवर्धनः ||

या श्लोकानें आर्यांची लक्षणे व आदर्श व्यक्ति यांचा बोध होतो. ‘आर्यः सर्व समचैत्र ‘आर्य हा सर्वसम असतो या लक्षणानें आर्याची आत्मनिष्ठा व ” सदैव प्रियदर्शनः’ त्याचे दर्शन सदैव सर्वांना प्रिय असतें या लक्षणानें त्याची सर्वतोपरि आकर्षकता व्यक्त होते. सर्व सद्गुणांनी अलंकृत असणाऱ्या आर्यांचा आदर्श पुरुष मर्यादापुरुषोत्तम श्रीराम होय हे या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीने सिद्ध होते. ‘कौसल्यानंदवर्धनः’ या पदानें सर्व लौकिक पारमार्थिक आदर्श जीवनाने सुशोभित असे आदर्श प्रिय पुत्रत्वाचेहि एक लक्षण उमटून दिसते. आर्याची दहा लक्षणे खालील लोकांत पाहावयास मिळतात.

शान्तस्तितिक्षुर्दान्तश्च सत्यवादी जितेन्द्रियः । 

दाता दयालुर्नम्नश्च आर्यः स्याद्दशभिर्गुणैः ॥

आर्य शांत, सहनशील, मनोनिग्रही, सत्यसंध, जितेंद्रिय, दानशील, दयाळू व नम्र असतो, शांति, तितिक्षा, मनोजय, सत्य भाषण, जितेंद्रियता, दातृत्व, दया व नम्रता हे आठ गुण असलेलाच आर्य होय. या आठ गुणांनीच आर्यत्व ओळखले जाते. ऐहिक तशा पारलौकिक दिव्य जीवनाच्या प्राप्ति करितां या आठ गुणांची आवश्यकता असल्यामुळे आर्य हे अखिल मानवजातीचेच मार्गदर्शक होते हे कोणाच्याहि मनांत बिंबण्यासारखे आहे.

home-last-sec-img