Literature

आषाढ वद्य अमावस्या

पिंडब्रह्मांडाचा अभिमानी असा जो जीवेश्वर तो केवळ आनंदघनब्रह्मस्वरूप असतांनाही मीपणाची
जाणीव, स्फटीकांत जसे निरनिराळे रंग दृग्गोचर होतात त्याप्रमाणे निरनिराळ्या उपाधीनी विक्षेप पावून
त्यांतून जीवेश्वराचे सृष्टिवैचित्र्य भासमान होते.

दिसणारे पिंडब्रह्मांड व त्याचा अभिमान बाळगणारे जीवेश यांना जागृतादी अवस्थेमुळे आणि माया-
अविद्येच्या उपाधीमुळे घडणाऱ्या कार्याचा अभास, चित्रांना ज्याप्रमाणे पडदा किंवा भिंत आधार असते
त्याप्रमाणे त्याच्या पाठीशी आनंदघन ब्रह्मच असते. तेच जीवेश, पिंड, ब्रह्मांड यांचे यथार्थस्वरूप होय.
आवरणविक्षेपामुळे घडणाऱ्या दृश्याभास आनंदस्वरूपात सर्व विलीन झाल्यास तेथे वस्तूंचे अस्तित्व व
आभास हे एक निश्चल असे केवळ आनंदरूपच आभासविरहीत अपरोक्षज्ञान शिल्लक राहिल्यास त्यासच
निर्विकल्प आनंदरूप ' आत्मसाक्षात्कार ' म्हणतात.

प्रकाशच जगाचे जीवन होय. सर्व दृश्य पदार्थ नष्ट झाल्यावर केवळ प्रकाशच शिल्लक रहातो त्याप्रमाणे
नामरूपात्मक जग नष्ट झाल्यावर तेथेही केवळ प्रकाशच शिल्लक असतो. हे जग प्रकाशित करणाऱ्या
सुर्यचंद्रांना प्रकाश देणारा जो आनंदरूप प्रकाश म्हणजेच आनंदाची जाणीव शिल्लक रहाते.
सर्व मुमुक्षू, साधकांना अशा प्रकारचा आनंदरूप दृढापरोक्ष आत्मसाक्षात्कार होवो !! ' हरी ॐ तत्सत् '

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img