Literature

आषाढ वद्य प्रतिपदा

भक्तीचे द्वैधी, समात्मिका व परा असे तीन प्रकार आहेत. शास्त्रोक्त विधान, अर्चन, जप, ध्यान करण्याने
भगवत्प्रेम वाढून प्रेमरूप भक्ती लाभते. तिच्यामुळे पुढे भगवत् कृपा होऊन तिच्या साक्षात्काराने भगवद्ऐक्य
लाभते. प्रथम द्वैधी भक्तीने परमात्मा माझ्याहून निराळा आहे या भावनेने आराधना होऊ लागते. भगवत्
लीलांचे श्रवण, किर्तन, स्मरण, सेवा, पुजन, वंदन, दास्य, सख्य व आत्मसमर्पण या नवविधभक्तींचा समावेश
भिन्नपणाने केलेल्या या आराधनेंत होतो. हिचेच नांव ' सगुण भक्ति ' नंतर भगवंताच्या कृपेने ज्ञानवैराग्यसंपन्न
ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंचा लाभ होऊन त्याच्या सान्निध्यात वेदांताच्या श्रवणाने, मननाने व निदिध्यासाने परमात्म्याच्या
निर्गुण भक्तीस प्रारंभ होतो. अशा दोन्ही सगुण व निर्गुण भक्ती परमात्म्यास मान्य आहेत. या दोन्हीचा

साधन-साध्य संबंध आहे. सगुण भक्तीने सलोकता, समीपता, स्वरूपता व सगुणसायुज्यता या
चतुर्विधमुक्ती प्राप्त होतात.

निर्गुणभक्तीने आनंदघन ब्रह्मस्वरूपाचा निर्गुण साक्षात्कार होतो. *' सत्सड्•गस्तु दुर्लभोऽगम्योऽमोघश्च
लभ्यते तत्कृपयैव | '* ( नारद भक्तिसूत्रे ) या सुत्राने भगवत् कृपेशिवाय सद्गुरूंचा लाभ होत नाही हेच सिध्द
होते. श्रीगुरूपासून अधिकारानुसार कर्म, उपासना, ज्ञान यांची प्राप्ती होऊन क्रमेण किंवा साक्षात् मोक्ष-
साधन लाभते.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img