Literature

आषाढ वद्य षष्ठी

ज्याच्या ठिकाणी कोणतेही अनिष्ट नाही, जेथे सर्व दुःखाचा अत्यंत अभाव आहे, सर्व
कार्यकारणसंघाताच्या पूर्वीपासून जे आहे, जे केव्हाही कधीही विकार पावत नाही व सर्वांचे निजअधिष्ठानरूप
असते असे जे अनंतानंत रूप तेंच ब्रह्म होय. आपले मुलस्वरूप असणाऱ्या ब्रह्मरूपांत विलीन होऊन सर्व
जीवमात्र कृतार्थ होतात. खरा आनंद प्राप्त करून घ्यावयाचा असल्यास आपण आपले मुळ स्वरूप प्राप्त
करून घेतल्याशिवाय गत्यंतर नाही म्हणून आपणही तेंच प्राप्त करून घेतले पाहिजे, त्यासाठीच जीवन जगले
पाहिजे असा अंतःकरणात भाव निर्माण होणे म्हणजेच 'परोक्ष'.

रज्जूसर्पन्यायामध्ये रज्जू हे अधिष्ठान असते त्याचप्रमाणे या सृष्टीतील सर्व कार्यकारणसंघातांना अधिष्ठान
असलेले परमपवित्र आनंदरूप आपणच आहोत हे निश्चितपणे समजावे. ते प्राप्त करून घेण्यातंच शांति व
तृप्ती आहे. त्यात इतर दुसरे कोणतेही नसून केवळ एकमेव आनंदस्वरूपच आहे अशी जी जाणीव तेच '
अपरोक्षज्ञान ' होय.

जे ज्ञान बाह्य अशा कोणत्याही नामरूपाने किंवा अंतःकरणातील कोणत्याही वृत्तीच्या जाणीवेस कारण
न होता अंतर्बाह्य उत्थानरहित निर्वात दिपाप्रमाणे निश्चल असे प्रकाशरूप, वृत्तीच्या पलीकडील असते
त्यालाच ' दृढापरोक्षज्ञान ' असे म्हणतात.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img