Literature

आषाढ वद्य सप्तमी

कोणतेही आवरण व विक्षेपचांचल्य नसलेला स्वयंप्रकाशाने सर्वत्र प्रकाशित होणारा म्हणजेच निर्विकल्प
असा एकमेव आनंदरूप असलेला ' आत्मा ' होय. *' आत्मा म्हणजे तो आपण '* आत्मा म्हणजे आपण
स्वतःच जो स्वतःचा साक्षात्कार किंवा आपल्या रूपाचे ज्ञान तो ' आत्मसाक्षात्कार ' अशाप्रकारे स्वतः होणे
यासच ' आत्मसाक्षात्कार ' म्हणतात. प्रत्येक जीवास *' तत्त्वमासि '* म्हणजे ' तुच तो आहेस ' असे श्रुतिमाता
समजावून सांगते. नेहमी एकरूप असणाऱ्या तुझ्यावर वांझेच्या पुत्राप्रमाणे लादलेल्या विक्षेपाने भासमान
होणाऱ्या पिंड, ब्रह्मांड, जीवेश इत्यादी भ्रमरूप अशा कोणत्याही भावनांना वश न होता, निर्विकारी, अद्वितीय
असा स्वतःच एकमेव आनंदघनरूप तुच आहेस ही सत्य गोष्ट होय असे ज्ञान होणे यालाच ' तत्त्वबोध ' व '
तत्त्वनिदर्शन ' असे श्रुतिमाता म्हणते. योग्य स्वानुभवाने मुक्ति प्राप्त करून घेण्याची इच्छा असणाऱ्या
साधकांना वरीलप्रमाणेच सद्गुरू उपदेश करीत असतात.

परमेश्वर कृपेने श्वेताश्वेतर ऋषि आत्मतत्त्व समजू शकले असे श्वेताश्वेतर उपनिषदाच्या शेवटी म्हटलें
आहे, यावरून आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी देव व गुरू या दोघांची कृपा होणे आवश्यक आहे. हा सिध्दांत
असला तरीही ईश्वरकृपा प्राप्त करून शेवटी मिळवण्यास योग्य असे एकमेव आनंदरूप स्वतःला स्वतः
समजून घेणे हा विनोदच नाही काय ? स्वतःच स्वतःला प्राप्त करून घेणे हाच याचा अर्थ.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज*

home-last-sec-img