Literature

आषाढ शुद्ध अष्टमी

सर्व देवता ब्रम्हस्वरूपी असल्याने त्या सर्व गुरूच होत. देहदृष्टीने विचार केल्यास मानवापूर्वी देवता निर्माण झाल्या आहेत. गुरूच्या हाती ज्याप्रमाणे मोक्ष असतो त्याप्रमाणे देवतांच्या हाती अभय देण्याचे शस्त्र आहे. दुष्टांचा संहार करून भक्तांचा मार्ग सुकर करण्यासाठीच सर्व देवतांनी शस्त्रे धारण केली आहेत. आपणांस ज्ञात करावयाची ब्रम्हविद्या श्रीगुरूपासूनच समजू शकते, असे असल्यामुळे जगांत सर्वप्रथम ब्रम्हविद्येचा उपदेश करणारा आदिनारायणस्वरूपी गुरूच होय. वैष्णव लोक नारायण श्रेष्ठ मानतात तर शैव शिवतत्व श्रेष्ठ, शाक्त जगदंबाच श्रेष्ठ, सौर सुर्यच श्रेष्ठ व गाणपत्य गणपतीच श्रेष्ठ असे म्हणतात. हे ज्याच्या त्याच्या दृष्टीकोनांतून योग्यच आहे आणि ते सर्व श्रेष्ठ असल्याने गुरूस्वरूपीच होत. पूर्वीपासून देवतांची आराधना गुरू म्हणूनच करीत असल्याचे आढळून येते. आजही त्याच गुरूरूपदृष्टीने देवताआराधनेकडे पाहिले पाहिजे.

गुरू म्हणजे कोणी लुंग्यासुंग्या नव्हे. ब्रम्होपोदेश म्हणजेच वस्तूस्थिती, जगाची यथार्थ कल्पना समजून घेऊन आपल्या ब्रम्हस्वरूपांचे दिव्यज्ञान देणारा जो कोणी असतो तोच सद्गुरू होय. गुरू शब्दांतील ‘गु’ कार हा अज्ञानरूपी असून ‘रू’ कार त्या अंधःकाराचा नाश करणारा असल्याने तेजोमय अग्निबीज आहे. अज्ञान नष्ट करून ज्ञानज्योतीचे ज्ञान देणारी महानशक्ती म्हणजेच सद्गुरू ही ज्ञानज्योत जेथे तेथे प्रकाशते ते सर्व सद्गुरूच होत.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img