कोणत्याही विकारांना बळी न पडता भक्ताच्यामध्ये परमात्मभावनाच असेल तर अगदी लवकर त्याचे अभिष्ट सिध्द होते व इप्सित प्राप्ती होते. सांगावयाची गोष्ट म्हणजे मनुष्याने परमात्म्यासाठीच जगले पाहिजे. काया, वाचा, मनाने तदेकचित्त होणे म्हणजेच भक्ति.
गुरूंच्या सेवेमुळे गुरूकृपा व ब्रह्मविद्या प्राप्त होते. या कलियुगांत गुरूकृपा प्राप्त करण्यासाठी व आशिर्वाद प्राप्तीसाठी आग्रह केला जातो हे अयोग्य होय. सद्गुरूंच्या तोंडून निस्वार्थी संतृप्त मनाने सहजगत्या स्फुरण पावलेले शब्द म्हणजेच आशिर्वाद. शक्ती, भक्ती व श्रध्दा ह्यानी संतुष्ट झालेल्या गुरूंचा एक आशिर्वाद असला की पूरे ! सेवेशिवाय प्रसाद घेणे हे विद्वानांना योग्य वाटत नाही. परंतु आमचे पुष्कळ शिष्य पैसे मिळवण्यासाठीच आग्रही बनतात वा आग्रह करतात. भिक्षुकांचे तर विचारुच नका ! तात्पर्य निष्कपटीपणाने मनापासून गुरूसेवा केल्यास तीच तुमचे संरक्षण करते. परंतु ह्या कालांत जास्तीत जास्त एक नारळ व दोन फुले ठेवताक्षणीच आपल्या सर्व अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत, अशी अपेक्षा प्रत्येकाची असते. असे असले तरी, ‘ साधवो भक्तवत्सलः ‘ या म्हणीप्रमाणे महात्मे कृपा करीत असतातच. पण काम झाल्यावर केलेला नवस ते सोयिसकरपणे विसरून जातात. गुरूकृपा विसरून निराळ्याच कारणाने या मंत्राने नाही तर त्या मंत्राने कार्यसिद्धी झाली असे म्हणणे हे काही खऱ्या सेवेचे लक्षण नव्हे ! *’ सेवाधर्मो परम गहनो योगिनामप्यगम्यः ‘* सेवाधर्म हा अत्यंत श्रेष्ठ धर्म होय.
*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*