Literature

उपनिषदांतील दोन प्रार्थना

भवे भवे नातिभवे भवस्व माम् । (तै. म. ना. उ.)

हे रुद्रा ! ऋजंद्रावयतीति रुद्रः । भवरोग नष्ट करणाराच रुद्र,

असा रुद्र या शब्दाचा अर्थ आहे. तेव्हां हे रुद्रा ! तूं आपल्या नांवाप्रमाणें मला या जन्ममरणांतून काढणाराच हो. माझ्या जन्ममरणाचे राहाटगाडगे पुनश्च सुरू करणारा कधींहि होऊं नकोस. अशी प्रार्थना या वैदिक मंत्रांत आहे. रुद्र हें सृष्टिलयकारक दैवत आहे. याला ‘महाकाळ’ असेहि म्हणतात. देह पडल्यानंतर काय शिल्लक राहातें म्हणून यमधर्माला जसे विचारावयाचे, तसेंच या देहासकट सर्व प्रपंचाचा लय झाल्यानंतर काय शिल्लक उरतें म्हणून विचारावयाचे झाल्यास, रुद्रालाच तें विचारावयाचे. पिंडब्रह्मांडाचा लय झाल्यावर शिल्लक काय राहातें, तें सांगण्यास त्यांच्या उपाधीच्या अधिकारानुसारेंहि यांना अधिकार पोहोचतो. या बाबतींत रुद्र म्हणजेच ईश्वर आणि यमधर्म हे सर्वथैव प्रमाण आहेत. वेदांनी कसल्या तरी एका निमित्ताला पुढे करून त्यांच्या आधारें तात्त्विक विचार प्रगट केला आहे.

योऽसौ सर्वेषु वेदेषु पठ्यते ह्ययमीश्वरः । 

अकायो निर्गुणो ह्यात्मा तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु ॥ ( महान्यास शिवसंकल्प २२)

— सर्व वेदांतून ज्या जन्मरहित अविनाशी परमात्म्याचे वर्णन केलें आहे, जो निर्गुण निराकार आहे, त्या परमात्म्याशी माझे मन तद्रूप होवो. माझ्या मनांत सदासर्वदा मंगलमय संकल्पच उत्पन्न होत असावेत अशी प्रार्थना यजुर्वेदांत आहे. देहामध्ये दिसून येणारी ‘मी’पणाची ही आत्मीय भावना जेव्हां नष्ट होते, जेव्हां देह, प्राण, मन, बुद्धि यांच्याशी कांहीं संबंध रा नाहीं, तेव्हां केवल सच्चिदानंद रूपानेंच हा जीव राहातो. तोच मोक्ष. अविद्येनें उत्पन्न होणाऱ्या वासनेच्या द्वारा, देहादिकांकडून अनुभविल्या जाणाऱ्या असत् जड, दुःखरूप विषयाच्या भ्रामक अनुभवाकरितां देहपरिग्रह जीवास होतो. अविद्या असेतोपर्यंत एक देह सुटला तरी वासनेचा आश्रय करून त्या त्या लोकीं, त्या त्या योनींत, तो तो दुसरा देह, तो धारण करतो. पण अशा रीतीनें किती जरी जन्म प्राप्त झाले, तरी मूलतः मीपणाच्या स्मृतीनें युक्त असे सच्चिदानंदरूप, सर्व जीवांतून कायम असतेच. देहादिकांचा अध्यास नष्ट होऊन, विषयसुखाची कल्पना ओसरून, जन्ममरणाची, लोकलोकांतराची व मनाची कल्पना मावळली आणि तदर्थ कर्म थांबलें आणि हेच केवल आनंदमात्र ब्रह्मच मी म्हणून ज्ञान झाले म्हणजे ” तदाविद्या स्वकार्येश्च नश्यत्येव न संशयः 

त्याच्यापुरती नष्ट होते. या जन्ममरणाच्या चक्रांतून तो सुटून, परमात्म्याची सायुज्य मुक्ति त्याला मिळते. श्रुतिशास्त्रांचा अभिप्राय हा असा आहे.

मेलेला परत जन्मत नाही, असे व्हावयाला अशा एवढ्या घटनेची अपेक्षा आहे. सर्वांनाच हा नियम लागू करून, मेलेला पुन्हां कसला जन्मास येतो, तो राहतोच कुठे, मातीचें गाडगें जें फुटून गेलें तें फुटूनच गेलें, मातींत मिसळून गेल्यानंतर पुन्हां जसे ते याचयाला राहात नाही. त्याप्रमाणेच पंच भूतांचा देह पंचभूतांत विरघळून गेल्यानंतर तो पुन्हां जन्मावयाला राहात नाहीं. पुनर्जन्मच नाहीं, देहाहून वेगळे चैतन्य आहेच कुठे ? इत्यादि विधानें प्रमाणभूत होऊं शकत नाहीत, श्रुतियुक्तीच्या कसाला उतरत नाहीत. हे जाबाली ऋषि महाराज ! तुमचे स्वतःचें हें जरी मत नसले तरी तुमच्या तोंडून आलेले विचार लोक निश्चित धरून चालतील व त्यामुळे पुढें मार्गे अनर्थ कोसळेल. या दृष्टीने त्याचे मी असे थोडें निराकरण करीत चाललो आहे. मातृपितृभक्ति, आस्तिक्यबुद्धि, सदाचार, दुराचार, पुनर्जन्म, स्वर्ग नरकादि गति, ब्रह्मलोकादि उत्तम लोकांची प्राप्ति, लोकान्तरगमन इत्यादि विषयांचे विवेचन केलें, आतां श्राद्धावर जो तुम्ही आक्षेप घेतला आहे त्याविषयी थोडा विचार करूं.

home-last-sec-img