Literature

कांहीं साधकांची उदाहरणें

कोणाचे वस्त्र मळलेले असू नये. जर का मळलेच तर मळलेल्या वस्त्रावरचा डाग आणि स्वच्छ वस्त्रावरचा डाग यांत अंतर आहे, म्हणून निःस्पृहांनी फार जागरुकीने अलीकडच्या काळांत वागावें.

मला एका साधकाने आपली एक हकीगत सांगितली होती. प्रस्तुत साधक प्रवासात असतांना एका घरी उतरला होता. त्या घरांतील अविवाहित तरुण मुलीनें या साधकांशी कामचेष्टेला सुरुवात केली तेव्हां त्या साधकानें फार शौचाला लागल्याचे निमित्त करून केवळ आपल्या कमंडलूसह तेथून पाय काढला. प्रवासातील भाड्याचे पैसे अंथरुण-पांघरूण याची पर्वा न करतां तो तेथून त्या अमावस्येच्या अंधारांतून ऐन मध्यरात्री खूप दूरवर पळत गेला आणि त्याने त्या संकटातून आपली सुखरूप सुटका करून घेतली.

धर्मेण निधनं श्रेयः : धर्माचें कांटेकोर रीतीनें पालन करीत असतां चूकून मृत्यु आला तरी तो मृत्यु मुक्ति देतो. धर्मो रक्षति रक्षितः ।धर्माचे रक्षण करणाऱ्यांचे धर्महि रक्षण करतोच. यतो धर्मस्ततो जयः। धर्माबरोबरच जय वागत असतो. न जातु कामान्न भयान्न लोभाद्धर्मंत्यजेज्जीवितस्यापि हेतोः’ कामानें, भयानें, लोभानें किंबहुना जगण्याच्या हेतूनेंहि क्वचित देखील धर्माचा त्याग करूं नये. ऐहिक सुख क्षणभंगुर असून नरकाचें साधन आहे. धर्म हा आपला कायमचा साथीदार असून मोक्षाचें साधन आहे. मला विचारले तर, ‘धर्माकरितां प्राण द्या, पण अधर्माकडे वळूनदेखील बघू नकाम्हणूनच मी सांगेन आणि तसेच स्वतः वागेनहि. धर्माकरितां प्राण दिल्यास पुढे तरी सुख आहे. अधर्माने कुठंच आणि कधींच सुख म्हणून मिळत नाही. बुडत्याचा पाय खोलात.पुन्हा अधिकाधिक पातके करून मोठमोठया नरकांचाच तो भागीदार होत असतो.

विवेकभ्रष्टानां भवति विनिपातः शतमुखः ।

वरच्या एका गोष्टीप्रमाणे अनेक गोष्टी माझ्या कानांवर आल्या आहेत. काहीना तथा प्रसंगी थोडा सुद्धा विकार न उत्पन्न होता ती बया ओशाळून परत गेलेल्यांची काहींनी अनेक प्रयत्नानी चुकविल्याची उदाहरणे आहे., ‘मन गया तो जाने दे। मत जाने दे शरीर । मन गेलें तर जाऊं दे, पण शरीर मात्र जाऊ देऊ नको. मनांत केवळ एखाद्याचा खून करावा म्हणून आले तर त्याला काही फाशीची शिक्षा होत नाहीं, प्रत्यक्ष कृति घडल्यासच शिक्षा. या तत्वाप्रमाणे विचार करुन देह तिकडे जाउ न देता प्रसंग निभाऊन नेल्याची उदाहरणेंहि माझ्या कानांवर बरीच आली आहेत. तेव्हां साधकांनी या बाबतीत जागे रहावे, आंधळे पाउलीं ओळखावें । धोरणानें सर्व ओळखून आपली उज्वल तेजस्विता बाणेदार वृत्तीनें कायम ठेवावी. तुझ्या देहाची घाण तुला अजूनपर्यंत वाटली नाहीं काय ? तुझ्या देहाची तुलाच घाण वाटल्यानंतर तुझ्या देहाचें सौंदर्य बघून मला भोगेच्छा कशी बरें होईल? म्हणून एका साधकानें विचारलेलेंहि मी ऐकले आहे.. दुसऱ्या एका साधकानें नख, केश, चर्म, मांस, रक्त, स्नायू, अस्थि मल, मूत्र, कफादिकांपैकी स्त्री म्हणून तूं कोण आहेस ते प्रथम सांग आणि मग तुला काय बोलावयाचें तें बोल !” म्हणून आपली सुटका करून घेतली, असेहि समजलें. 

बंगालमध्ये, कालीमातेची आराधना करीत ब्रह्मचर्याने राहणारीला भैरवी असे म्हणतात. अशी एक भैरवी यात्रेला म्हणून निघाली असता एका दाट अरण्यांतल्या रस्त्यांतून जाण्याचा तिला प्रसंग आला. एकटीला बघून यवनांनी तिला घेरली. तेव्हा खाली बसून तिनें श्रीकालीमातेचें ध्यान केले मात्र, इतक्यांत त्या यवनांना कालीचें अत्यंत भीषण रूप दिसून पळून जाता जाता भुई थोडी झाली, म्हणून एकाने मला सांगितले. अशा या भैरवी दुसरे सर्व उपाय हरल्यानंतर पोटांत खुपसून घेऊन प्राण देण्या करिता आपल्याजवळ एक सूरा बाळगून असतात, असेहि तो म्हणाला.

home-last-sec-img