Literature

कार्तिक वद्य चतुर्दशी

भारतातील सर्वश्रेष्ठ पुरूष प्रथम अध्यात्मिक उन्नति करून घेऊन आपणांवर येणाऱ्या आपत्तीचे आपल्या सामर्थ्याने निराकरण करीत असतात. शांतचित्ताने, उज्वल विवेकाने वैषयिक जीवनाचा तिरस्कार करून या जन्मातील अत्यंत महत्त्वाचा लाभ म्हणजेच परमात्म्याचा अनुभव निर्धाराने प्राप्त करून घेतात आणि त्यायोगे प्राप्त झालेल्या दिव्यदृष्टीने, उत्तमशक्तीने जगताचा उध्दार करू शकतात. जन्मलेल्यास मृत्यू व मृत झालेल्यास पुन्हा जन्म हे ठरलेलेच आहे. पण अशा जन्ममृत्यूस काय किंमत आहे ? आत्मानुभव मिळवून परमात्मपद प्राप्त करून घेणाऱ्याच्याच जीवनाचे सार्थक होते. असे लोकच आपल्या कुलाचा व आपल्या भोवती असणाऱ्या जगताचा उध्दार करू शकतील. ज्यांचे मन अपार ज्ञानमय सुखसागरांत मग्न झालेले आहे त्यांचेच कुल पवित्र होय. त्याच्या जन्मदात्या आईस मातृत्वाचे सत्फल मिळून तो कृतार्थ होईल. त्याच्या भ्रमणामुळे भुमीही पुण्यमय होईल. अध्यात्मज्ञानाने प्राप्त झालेल्या आत्मसुखरूपी समुद्रात मन रममाण होऊन त्यात पूर्णपणे तन्मयता प्राप्त होईल. हे सोडून पशूंना स्वाभाविकतःच असलेल्या आहार, निद्रामध्ये रममाण होणे म्हणजे पशुतुल्य जीवनच होय. मानवदेहांचे भूषण व ध्येय असणारे खऱ्या सुखाचे साधन म्हणजेच अध्यात्मज्ञान होय.

 

  *श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज*

home-last-sec-img