Literature

कार्तिक वद्य दशमी

प्रत्येक प्राणीमात्र आपणांस जगावयाचे आहे हे जाणतो व त्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान व प्रयत्न त्याच्याजवळ आहेत. पण त्यात त्याला समाधान वाटत नाही. आपल्याला निरंतर सुख, आनंद मिळावा म्हणून तो सारखी धडपड करीत असतो. एखादेवेळी भान राहणार नाही पण सुखाची स्मृती, सुखाची आशा यासाठी चाललेले प्रयत्न आपणास पहावयास मिळतात. मुंगीपासून इंद्रापर्यंत सर्व जीवांना आनंद हवा असेच वाटत असते. ‘ तो आनंद प्राप्त करण्यासाठीच आपला जन्म झालेला आहे ‘ असे श्रुति म्हणते. जन्म पावलेले जीव आनंदामुळेच जगतात व शेवटी आनंदातच विलीन होतात. असे असल्यामुळे इहलोकांत जन्म घेणे हे एक आनंदप्राप्तीचे साधन आहे. असे उघडपणे ठरते. याच्याच जोडीला नैसर्गिकरीत्या प्राणीमात्रांच्या इच्छा पाहिल्यास त्यांचा अखंड आनंद लाभाचा उद्देश असला पाहिजे असे आढळून येते.

या आनंदप्राप्तीच्या साध्य-सिध्दतेसाठी केली जाणारी कर्मे तितकीच महत्त्वाची आहेत. कदाचित त्यामध्ये अधिकार-भेद असू शकेल. साधनामध्येही तारतम्यभाव असू शकेल व वैचित्र्यही असू शकेल. परंतु सगळ्यांचा केंद्रबिंदू एकच आहे हे विसरून चालणार नाही. अनुभवाने संस्कारित झालेले जीव ज्या एकाच केंद्राकडे जात आहेत. तो केंद्रबिंदु म्हणजेच अनंत सुख, अखंड आनंद होय.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img