Literature

कार्तिक वद्य सप्तमी

कोणतेही कार्य शक्तीच्या योगाने होत असते. परमात्म्याच्या शक्तीने अनेकत्व, बहुत्व व विविधत्व धारण करण्याचा संकल्प केला. कार्यक्षमता व कार्यसिध्दी हे शक्तिमुळेच होते व ती शक्ति म्हणजेच परमात्मा. परमात्म्यामध्ये शक्त असल्याने तिचा अविर्भाव म्हणजेच जग. वास्तविकरित्या शक्ति व शक्तिमान हे वेगळे नाही. मानवास बोलण्याची शक्ती आहे. तो ज्यावेळी बोलत नाही त्यावेळी ती शक्ती त्याच्यातच एकरूप झालेली आहे. सृष्टिकार्य चालु असतांना परमात्मा व शक्ती हे भिन्न भिन्न दिसत असले तरी ज्यावेळी सृष्टिकार्य संपेल त्यावेळी परमात्मा व शक्ती ही एकच असतात. सृष्टी म्हणजे परमात्म्याचे प्रकट स्वरूप किंवा प्रादुर्भाव.

परमात्माच स्त्री-पुरूषांच्या रूपाने व्यक्त झाला आहे. स्वतःच त्याने ही दोन्ही रूपे धारण केली आहेत. स्त्री किंवा पुरुष प्रथम ‘ मी ‘ असे म्हणतात. प्रत्येक व्यक्तीत असलेली मीपणाची संवेदना म्हणजेच परमात्म्याचे अभिन्न स्वरूप होय. गृहस्थाश्रमातील होणाऱ्या संततीद्वारे या ‘ मी ‘ चाच विकास होत असतो. या रूपाने परमात्मा आपल्यामध्ये नखशिखांत व्यापला आहे. असे असल्यामुळे आपण परमात्मा आहोत या कल्पनेत चूक कोणती ? मानवाची संतती ही मानव आहे हे ज्याप्रमाणे चुकीचे नाही त्याप्रमाणे परमेश्वर निर्मित मानव हा परमेश्वर आहे हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img