संत नामदेव, संत तुकाराम इत्यादि महान भगवद्भक्तांची चरित्रे आपण भक्तिभावाने समजून घेतल्यास आपल्या अंगावर काटा उभा राहतो, असे म्हणण्याचा अर्थ काय ? असे एखाद्याने विचारल्यास ‘ साखरेच्या गोडी सारखा ‘ हेच उत्तर मिळेल. *’ अनिर्वचनीयं प्रेमस्वरूपम् ‘* भक्तीचे महत्त्व भक्तच जाणूं जाणे. ते शब्दाचे वर्णन करणे अशक्य आहे. भक्तीचे वर्णन करावयाचे झाल्यास मानवी शब्द कमीच पडतील. भक्ती ही भक्ताच्या मनानेच जाणणे शक्य आहे. अनुभवानेच भक्ती समजू शकते. स्वतःच्या अनुभवानेच अनुभवता येणाऱ्या भक्तीच्या बाबत शब्दावडंबराने कंठशोष करण्यापेक्षा तिचा अनुभव घेऊन पहा ! ती समजून घ्या !! असे सांगणेच जास्त श्रेयस्कर होय.
भक्तिमार्ग सर्वांना अनुकूल असाच आहे. तेथे वर्णाश्रमाचा घोळ नाही. सर्व मार्गापेक्षा श्रेष्ठतम आणि निरवधि सुखदायक आहे. भक्तिसंपन्न अशा भगवद्भक्तास तिन्ही लोक तुच्छ वाटतात.
भक्ति नवविधा आहे. त्यापैकी नामसंकीर्तन म्हणजे भगवंताच्या नामस्मरणाने भक्तांचा उद्धार होतो. याबाबातीत अजामिळाचे उदाहरण सर्वोत्कृष्ट आहे. कृतकर्माबद्दल पश्चाताप होऊन मनःशुध्दी प्राप्त करून नामस्मरण केल्यास मानव पुनीत होतो याबद्दल शंकाच नाही.
*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*