Literature

कार्तिक शुद्ध चतुर्थी

पैशाची गरज लागल्यास मनुष्य सावकाराकडे जाऊन दीनवाणीने पैसे मागतो. तसेच परमात्म्याजवळ मागितले तर ? तो तर लक्ष्मीपती आहे. सर्व जग त्याचा सुक्ष्मांश अथवा समुद्रातील एक थेंबच. त्याच्या नांवात अनंत सामर्थ्य आहे. त्याला हाक मारल्यास, आई आपल्या मुलाकडे जशी धावत येते त्याप्रमाणे तो धावत येईल. मग काय कमी पडणार ? हे सर्व माहित असूनही लोक फसतात. कोठेच निष्ठा नाही ! आपण भक्तिभावाने गजेंद्राप्रमाणे किंवा द्रौपदीप्रमाणे धावा केल्यास परमात्मा येतोच येतो. आपल्या या संसाराच्या जंजाळात आपण परमेश्वरास विसरतो. अशावेळी सूक्ष्मपणे आत्मनिरीक्षण केल्यास आपणांतच भक्ती नाही हे कळेल.

परमात्म्यामध्ये अत्यंत प्रेम ठेवून कार्यप्रवृत्ती व्हा ! त्याकरता भौतिक व्यवहारात जेवढे प्रेम करतो तेवढे प्रेमही पुरेसे आहे. त्यामुळे परमात्मप्राप्ती होते. आपण ज्यावर जास्त प्रेम ठेवु त्याचा साक्षात्कार होतो. आपले विषयावर प्रेम तर आपल्याला त्याचा साक्षात्कार होईल. पण त्यापासून फायदा काय ? एवढे काबाडकष्ट करून शेवटी काय मिळविले ? केलेल्या प्रयत्नांची किंमत काय ? सुख जर आपल्या कल्पनेपेक्षा वेगळेच असेल तर आतापावेतो अहोरात्र केलेल्या कष्टांचा काय उपयोग ? अर्थ नसलेला व्यवहार कोणासाठी व कशासाठी ? या सर्वांहून श्रेष्ठा अशा नित्यानंद अशा परमात्मपदासाठी वर्णाश्रम धर्मास अनुसरून कष्ट करा ! तोच फायदा !! प्रामाणिकपणे कष्ट केल्यानेच खात्रीने सार्थक होईल.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img