Literature

कार्तिक शुद्ध तृतीया

जगाचे मूळ परमात्माच. तो जगोत्पत्तीपूर्वीही होता. त्याने निर्माण केलेले जग चालविण्यासाठी त्यात प्रवेश केला. या देहातहि तो आहेच. त्याची शक्ती विश्वव्यापी आहे. अशा या परमेश्वराचे यथार्थ रूप समजवून न घेतां, न मिळवतां, दुसऱ्या विषयात सुख शोधल्यास सापडेल काय ? सुख असते एकीकडे व आपण शोधतो दुसरीकडे. अशा भ्रमिष्ठ लोकांना मिळणारे विषयातील सुख काल्पनिकच. कल्पनेच्या सुखाला काही स्थैर्य आहे कां ? एखाद्या विषयात असणारे सुत्र दुसऱ्या क्षणी तेथे आढळत नाही. एकेकाळी प्रिय झालेली वस्तु दुसऱ्यावेळी प्रिय असेलच हे सांगता येत नाही. आता आवडणारी वस्तु थोड्याच वेळात आवडेनाशी होते. या सर्व कारणांनी सुखमय परमात्म्याला विसरून जगातील विषयांच्या काल्पनिक सुखाच्या मागे लागल्यास आशा मात्र वाढत जाते. संताप वाढून तो अग्नीप्रमाणे ह्रदय जाळून टाकतो. नेहमीच असमाधान वाटते. शांति मिळत नाही. एकंदरीत या काल्पनिक सुखाच्या मागे लागल्याने नेहमीच्या सामान्य सुखालाही आंचवुन दुःखच वाढवुन घेतल्यासारखे होईल. खरे पाहिले तर परमात्म्याला विसरून केलेली सुखाची इच्छा विनाशकारीच ! खरे सुख म्हणजे परमात्माच. परमात्म्याच्या ठिकाणी प्रेम करून शांती मिळवणेच न्याय्य नाही कां ?

परमात्म्यापासूनच सुखप्राप्ती होते असे समजून संसारात वागल्यास, संसारावर आपण जेवढे प्रेम करतो त्याच्या शतांश प्रेम परमात्म्याच्या ठिकाणी भक्ति केल्यास आपणास सायुज्याची प्राप्ती होईल !

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img