Literature

कार्तिक शुद्ध षष्ठी

विषयसुखापासून मनःशांती मिळविण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच मीठ विरघळविलेल्या पाण्याने आपली तहान भागविण्यासारखेच होय. एकंदरित या उदाहरणावरून विषयसुखाने मनःशांती प्राप्त होत नाही हे स्पष्ट होते. विषयसुख अपूर्ण आहे. विषयामुळेच सुखाचा भास होत असतो हे उघड असल्याने त्याच्यामुळे तृप्ती कशी मिळणार ? भास तो भासच !! असे असता भोगाच्या मागे लागून सुखप्राप्ती करण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ होय. म्हणून शाश्वत तृप्ती मिळविण्यासाठी पूर्ण अविनाशी, अचल असे सुख प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. परमात्म्याने सर्व वस्तुंची निर्मिती करून सुखेच्छा पसरविली आहे व हे त्याने मानवी मन शाश्वतसुखाकडे आकर्षित होण्यासाठीच केले असले पाहिजे. यांचे मर्म जाणून विचार करण्यासाठीच ह्या नरजन्माची प्राप्ती आहे. नरजन्माचा मुख्य उद्देश शाश्वत सुख हाच आहे. लहानपणापासून बुध्दीचा विकास होत असल्यामुळे त्यावेळेपासून परमात्मप्राप्तीसाठी प्रयत्न करणे आपले कर्तव्य होय व तेव्हापासून विषयसुखाकडे दुर्लक्ष करणे योग्य होईल. कारण मानवी जीवनाचा हा बहुमोल काल व्यर्थ घालविणे अयोग्य होय. विषयसुख हे *’ दुरून डोंगर साजरे ‘* याप्रमाणेच आहे. डोंगर जवळून जाऊन पाहिल्यास तो ओबड-धोबड दिसतो. तद्वतच विषयांचे आहे. यासाठी सत्यस्थिती जाणणे हे नरजन्मातील एक कर्तव्य आहे.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img