Literature

कीर्तनकार कसा असावा

“धर्म म्हणजे “धारणात् धर्मनित्याहु: ” ज्यामुळे नर हा नारायण होऊ शकतो ती शक्ति. धर्मामुळेच परमेश्वराचे स्वरूप प्रकट होते आणि जगाचे अस्तित्व टिकू शकते. सत्यस्वरूप परमात्मा जगाचे अधिष्ठान आहे. “धर्मोविश्वस्य जगतः प्रतिष्ठा” म्हणून धर्माचा आश्रय आम्हाला अत्यंत आवश्यक आहे. “सनाती आतनोति सनातनः” परमात्मसुखाचा, स्वरूपाचा सत्य असा अविष्कार धर्मामुळे होऊ शकतो.”
“आर्यांनी जो सांगितला तोच धर्म, आर्य म्हणजे श्रेष्ठ, आर्याचे सहज बोलणे हाच धर्म! “विद्वद्भिः सेवितः सद्धिः” म्हणजे विद्वानांनी जो आचरिला तो धर्म | श्रुति स्मृतींनी सांगितला तो धर्म, अन्य अधर्म, ऐहिक व पारमार्थिक कल्याण साधून देणारा तो धर्म, “वेदोऽखिलो धर्ममूलम् ” ब्रह्मदेवाची वाणी म्हणजेच वेद. वेदाशिवाय ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान शक्य नाहीं. “नहि वेदात् परं शास्त्रम्” वेदविद्या एकदेशीय नाही. मनसोक्त आचरणाचे जे धर्म जे लोक आचरतात ते इहपर सौख्यास मुकतात”.
“शास्त्र म्हणजे वेद आणि “वेदो नारायण: साक्षात् ” वेदाने जीवनातील जो मार्ग आंखून दिला तो मार्ग म्हणजे धर्म. कीर्तनकार खऱ्या अर्थाने कोणाला म्हणता येईल? वेदांतील विद्या सांगतो तो कीर्तनकार | श्रद्धा, भक्ति, ज्ञान, ” स्वधर्म-कर्म-साधन” असें ज्याच्या कीर्तनांत येतात तोच कीर्तनकार”
“ब्रह्मरूप काया होतसे कीर्तनीं ।।” कीर्तनांतून ब्रह्मानंद प्रकटतो. जीवनाचा मार्ग कळतो. धर्म प्रकट होतो. “कलौ कीर्तनं वरिष्ठम् ” नादब्रह्म कीर्तनात आहे. प्रचारकार्याचे कीर्तन हे एक साधन आहे. तें प्रभावी व्हावे यासाठी ” आधी केले मग सांगितलें” हा कीर्तनकारांचा बाणा असावा कीर्तनाचा महिमा काय सांगावा ?
ब्रह्मसुत सदा सर्वदा कीर्तन करतात. ब्रह्मसुत म्हणजे नारद, नारद म्हणजे न भरं स्वल्पं ददातीति नारदः” याचा भावार्थ अल्पस्वल्प न देणारे ते नारद. जे मर्त्व तें अल्प. ‘अविनाशी शाश्वत सुख देतात ते नारद’ हे शाश्वत सुख देणाऱ्या नारदाचे कार्य कीर्तनकारास करावयाचे असते. ते कार्य आपल्या हातून व्हावें. कीर्तनकार हा सदाचार संपन्न असावा. त्याच्या प्रतिपादनांत उपासनेचे ओज असावे, त्याला पहातांच सात्विक भाव निर्माण व्हावा व आदर उत्पन्न व्हावा. कीर्तन हे धर्माचे प्रधान अंग असून कीर्तनकार त्याचा प्रचार करणारा जबाबदार हरीचा दास आहे. या दृष्टीची आपल्यावरची जबाबदारी हरिदासांनी ओळखली पाहिजे. सर्वत्र दु:खी कष्टी असलेला समाज कीर्तनकार मंडळींकडे मोठ्या आशेने पाहतो. त्या समाजाचे दु:ख अंशत: कमी करण्याची जबाबदारी कीर्तनकाराची आहे हे विसरतां कामा नये. प्रतिपाद्य विषयसुद्धा हरिभक्ति व सात्विक वृत्ति निर्माण करणारा, नीतीचे धडे शिकवणारा व उन्मार्गगामी समाजाला परावृत्त करणारा म्हणजे लोकसंग्रही असावा; तरच तो समाजाचे कल्याण करू शकतो. समाज सुधारण्याचे पुण्यकर्म हरिदासाचे आहे. कारण तें हरीचे दास आहेत. म्हणून कीर्तनाची गादी सदा पवित्र राहील असा सतत प्रयत्न आपल्या आचार विचारांनी कीर्तनकारांनी करावा. ईश्वराचे पाठबळ त्यांना सदैव राहील. मी लौकिक व्यवहारात तुमच्या पुढे असलो तरी, मी कोठहि असतो. धर्मकार्य जेथे जेथे होत आहे तेथे तेथे मी तुमच्या पाठीशी आहे. म्हणून माझा तुमच्या सर्व कार्यात आशीर्वाद आहे. तुम्ही धर्माचें कार्य करता ते मला फार आवडते. जेथे धर्मकार्य चालते तेथे माझे अस्तित्व नेहमीच असते. मला ते फार आवडते. धर्मकार्यासाठी हातभार लावणारे मला अत्यंत प्रिय आहेत. खूप धर्मकार्य करा व संमेलन यशस्वी होऊ द्या.”
(नासिक कीर्तन सम्मेलन, शके १८८२)

home-last-sec-img