Literature

चैत्र वद्य त्रयोदशी

हें जग अविनाशी आहे काय ? जगाला विनाश असल्यामुळे त्यापासून दुःख – निर्मिती होते. जें नष्ट होतें, नाश
पावतें ते अशाश्वत होय. प्रत्येक दृश्य वस्तूत बदल होत असतो, तिच्यात विकार निर्माण होतात. क्षीणता येते.
बदल होणे, विकारेत्पत्ती व झीज हा दृष्य जगाचा स्वभाव आहे आणि हाच नाश होय. जगतामध्ये शाश्वत असें
काहींहि नसल्यानें त्यापासून आनंदप्राप्ती कशी होणार ?

आपल्या मूळ स्वरूपांत असलेला आनंद प्राप्त करून घ्यावयाचा असल्यास प्रथम आपल्या चित्ताची
एकाग्रता झाली पाहिजे. बाह्य अशा नानाविध पदार्थांच्या मागें धावणारे व त्या पदार्थातच आनंद आहे अशी भ्रामक
कल्पना करणारें आपलें
चित्त स्थिर व एकाग्र होणे अत्यावश्यक आहे, आणि ह्याकरता चित्ताला त्याच्या ठिकाणी मूलतःच असलेल्या
एकमेव आनंदाची गोडी लाविली पाहिजे. म्हणूनच त्यासाठी आनंदाच्या अस्तित्वाचा निश्चय करणे हाच एकमेव
उपाय आहे. 'मी आनंदरूप आहे ' असा निश्चय सतत चित्तांत स्थिर रहाणें हाच उपाय असून त्यांतूनच मोक्षप्राप्ति
आहे. आनंदाच्या अस्तित्वाचा निश्चय तुम्हा सर्वांमध्ये स्थिर रहावा

व तुम्ही सर्वांनी चिन्मय अशा केवळ आनंदामध्ये अखंडित रहावें हाच माझा तुम्हा सर्वांना आशीर्वाद आहे.

श्री प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img