Literature

चैत्र वद्य प्रतिपदा

एखाद्याची इस्टेट दुस-याने बळकाविली अशी कल्पना केल्यास ज्याची इस्टेट गेली तो सुखी असत नाहींच पण ज्याने ती बळकाविली तोहि सुखी झाला आहे असे पहावयास मिळत नाहीत. कारण मूळ इस्टेट मालक आपल्यावर केव्हातरी कुरघोडी करील अशी त्यास सारखी भिती वाटत असते. अशा लुबाडणा-या मनुष्याकडे समाजहि अनादरानेंच पहातो. त्यांमुळे त्यांच्या अडीअडचणीस कोणीही उपयोगी पडत नाही व शेवटी आलेल्या मार्गानेंच ती इस्टेट निघून जाते असेंच पहावयास मिळते. यामुळे त्याच्या मनास तृप्ती व शांती न मिळता ह्या जन्मी सदोदित दु:ख व काळजीचे तो भक्ष्य बनून, अंती नरकास पात्र होतो.

स्त्रीनें पतिव्रत्यानें व पुरूषाने एकपत्नी व्रताने आपले जीवन व्यतीत केले पाहिजे, अशा दांपत्यापासून सत् प्रजा उत्पन्न होत असते व त्या सतपुत्राकडून कुलाचा उध्दार होत असतो. अशा दांपत्यजीवनात कामक्रिडा ही संतत्योत्पत्तिसाठीच असून स्वेच्छाचारासाठी नसते. स्वेच्छाविहाराने शरीर रोगी बनते. मनोदौर्बल्य प्राप्त होते आणि त्यायोगें उरलेल्या जीवनामधील आवश्यक कर्तव्ये पार पाडण्यासाठी लागणारी शक्ती व मनोधैर्य शिल्लक रहात नाही. धर्ममार्गाने जाण्यासाठी आवश्यक असणारी मनोवृत्ती ज्याने खर्ची पाडिली आहे अशा स्वेच्छाविहारी लोकांचे अध:पतनच होते.

home-last-sec-img