Literature

चैत्र शुद्ध अष्टमी

श्रीराम सर्वतोपरी तारक आहेत. गर्भाच्या, जन्माच्या, म्हातारपणाच्या अंती अनुभवावयास लागणाऱ्या मरणाच्याही दु:खापासून जे सोडविते, संसारातील अज्ञान महाद्भाग्यापासुनही ज्यामुळे कायमची सुटका होते तेच ‘तारक’ होय. ‘श्रीराम ब्रह्मतारकम’ असे म्हणण्यात तारक शब्दाचा हा सर्व अर्थ अभिप्रेत आहे.

श्रीरामोत्तरतापिनीत श्रीरामास ‘तारक प्रणवरूप’ म्हटले असून मांडुक्याप्रमाणेच त्याच्या अ, उ, म आणि अर्धमात्रा म्हणजे तुर्यस्थितीची चतुर्थावस्था अशा चार मात्रा वर्णिल्या आहेत. प्रणवाच्या ‘अ’ काराक्षरापासून ‘लक्ष्मण’ उत्पन्न झाला असे सांगून त्यालाच पिंडब्रह्मांडातील जागृतीचा अभिमानी म्हणून अनुक्रमे ‘विश्व वैश्वानर’ ह्या नावांनी संबोधिले आहे. ‘उ’ काराक्षरापासून ‘शत्रुघ्न’ उत्पन्न झाला असे सांगून त्यालाच पिंडब्रह्मांडातील स्वप्नाचा अभिमानी म्हणून ‘तैजस हिरण्यगर्भ’ अशा नावांनी संबोधिले आहे. ‘म’ काराक्षरापासून ‘भरताची’ उत्पत्ती झाली असे सांगून यालाच पिंडब्रह्मांडातील सुषुप्तीचा अभिमानी म्हणून ‘प्राज्ञ’ ‘ईश्वर’ या नावानी संबोधिले आहे. प्रणवाची चतुर्थ अर्धमात्रा ‘श्रीरामरूप’ आहे म्हणून सांगून तो ब्रह्मानंदैकविग्रह आहे असे त्याचे वर्णन केले आहे. या परब्रह्मरुपी श्रीरामाच्या सानिध्यवशात जगदानंददायक सर्वनामरूपात्मक अशा विश्वदेहाची उत्पत्ती-स्थिती-संहार करणारी त्याची बुद्धीसदृश मूळप्रकृतीरूप शक्ती तीच ‘श्रीसीता’ असे वर्णिले आहे. ह्यावरून श्रीरामाचे स्वरूप लक्षांत येण्यासारखे आहे.

श्री प.प. सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी

home-last-sec-img