Literature

चैत्र शुद्ध सप्तमी

‘ रामस्य अयनं रामायणम् ‘ अयन याचा अर्थ जाणें, गति, रस्ता असा होतो. अधर्मरूप रावणावर धर्मरूप रामाने चाल करून त्याचा नायनाट केल्याची कथा प्रामुख्याने ज्यात आहे तेच रामायण असाहि त्याचा अर्थ होतो. जें परब्रह्म परमात्मरूप श्रीरामाकडे घेऊन जातें, तिकडे जाण्यासाठी चालना देते किंवा उत्सहिक करते म्हणजे गति देते, जीवनाचा खराखुरा मार्ग दाखविते, तेंच ‘ रामायण ‘ होय. अयन याचा अर्थ आश्रयस्थान असाहि होतो. रामाचे स्थान म्हणजेच रामायण होय. मुक्तिकाेपनिषदांत पुढीलप्रमाणें वर्णन आहे.

श्रीरामचंद्रांची भक्तिभावानें शुश्रुषा करीत वक्त्यांची स्तुतिस्तोत्रे गात गात श्रीमारूतीरायांनी विचारले ‘ श्रीरामा ! तू सच्चिदानंदघन परमात्मा आहेस, तेव्हा तुझें तें स्वरूप मला मोक्षासाठी तत्त्वत: जाणावयाचे आहे. तेव्हा मी काय करू ? त्यावर श्रीराम म्हणाले ‘ मी वेदांताच्या ठिकाणी सुप्रतिष्ठित आहे म्हणून तूं वेदांताचा आश्रय कर. ‘ रामायण म्हणजे श्रीरामाचे निवासस्थान ह्या अर्थी, श्रीरामाचे निवासस्थान असणारा वेदांतच श्रीरामायण आहे हें सिध्द होते.वेदांतापर्यंत वेदच एकमेव असणार या दृष्टीने वेद म्हणजे रामायण व वेदवेद्य परमात्मा हा श्रीरामप्रभु असा येथील पारस्पारिक संबंध आहे.

चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे व अठरा स्मृतिमधून, अखिल अध्यात्मिक विद्यांतून, निखील विद्यादानांतून,सर्व उपास्य देवतातून तारकारूपाने जें परब्रह्म सुप्रतिष्ठित आहे तें परब्रह्म म्हणजे श्रीराम. सर्व तपश्चर्येचा आदर्शहि श्रीराम आहे. श्रीरामच परतत्त्व व तारक ब्रह्मरूपी गुरूतत्त्वहि श्रीरामच. असे श्रीरामरहस्यांत श्रीमारूतिरायानें सनकादि मुनींना सांगितले आहे.

!! जय जय रघुवीर समर्थ !!

प.प. सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी

home-last-sec-img