Literature

ज्ञान योग

वेद हे त्रिकांडात्मक असल्याने तिन्ही कांडे मिळून झालेल्या वेदांचा मुख्य विषय परमात्म्याचे ज्ञान करून देणे हाच आहे. कोणत्याही प्रकारे परमात्म विषयास बाधक असणारे विचार प्रगट करण्यास वेद कधीच तयार नाहीत. वेदांनी जे काही सांगितले आहे त्यामधून ते परमात्म्याबद्दलचे विचारच प्रगट करीत असतात. ‘ज्ञानकांड हे वेगळे असून त्याचा कर्मकांड व भक्तिकांडात समावेश होत नाही. भक्ति ही स्वतंत्र असून तिच्यामध्ये ज्ञान येत नाहीं. ज्ञान हे निराळेच पृथक व स्वतंत्र आहे. तेच एकमेव आत्मस्वरूप ज्ञानाचा प्रगतीला कसे कारण होणार’ अशी सामान्यजनांची मूढपणाची भावना आहे.

वेद आपल्या उद्देशांचे उल्लंघन कधीही करीत नाहीत. परमात्म्याशिवाय इतर कोणतीही भावना वेदापासून निर्माण झाल्यास त्यामुळे वेदांचे, वंचकत्वच सिद्ध होईल. ह्या दृष्टीने विचार केल्यास वेद उपासनाकांडाचेच विवरण करतात व त्याद्वारे परमात्म्याचे स्वरूप सांगणारी, दर्शविणारी संकल्प प्रवृत्तीच विवेकी मनुष्यास आढळून येते. ब्रह्म हे सत् चित् आनंदात्मकच ! ब्रह्म कसे आहे ? असे विचारल्यास त्याची ओळख दर्शविण्याच्या सर्व साधन लक्षणांपेक्षा अगदी थोडक्या लक्षणांनी त्या परमात्म्याचे वेदांनी सांगितलेले स्वरूपलक्षणच ‘सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्म’ अशी सद्रूप, चिद्रूप व आनंदरूपी ब्रह्मस्वरूपाची श्रुतीनी व्याख्या केली आहे. ह्या तिन्ही लक्षणांनी श्रुति एकाच ब्रह्माला संबोधितात असे म्हटल्यावर ही तिन्ही लक्षणे वेगवेगळी होत नाहीत. ‘सतूरूप ब्रह्म’ असे म्हणताच ही लक्षणे आनंदामध्ये समाधिष्ठित असतात. ‘चित्रूप ब्रह्म’ म्हणताच आनंदाची सर्व लक्षणे त्यात समाधिष्ठित असलीच पाहिजेत. तसेच ‘आनंदरूप ब्रह्म’ म्हटल्यावरही त्यात सत्-चितूरूपाची लक्षणेहि असतात हे ह्यावरून स्पष्ट होते.

ब्रह्म शाश्वत असल्याने ते दाखविण्यासाठी त्याला ‘सतूरूप’ म्हटले जाते. शाश्वत म्हणजे नेहमी अस्तित्वात असणारे तेच नित्य, सत्य, स्वतंत्र, सत्तामात्र अशा अनेक प्रकारच्या नावांनी संबोधिले जाते. कायम, नेहमी, निरंतर राहाणाऱ्या वस्तूलाच ‘ब्रह्म’ असे नांव आहे. श्रुतींनी कर्मकांडाद्वारे ब्रह्मस्वरूपाची ‘सतरूपता’, भक्तियोगाद्वारे ‘आनंदस्वरूपता व ज्ञानकांडाद्वारे ‘चितूरूपता’ व्यक्त केली आहे. कर्माच्या योगे सत्रूपता व शाश्वतता समजावून दिल्यासारखे कसे होईल ? जे कर्म केले जाते त्याचेच फळ अनुभविले जाते. हा कर्मकांडाचा सिद्धांत आहे. जो हेतू असलेल्या हेतूला, संकल्पाला अनुरूप असे कर्म, साधन, कर्मकांड सांगत असते. स्वर्गभोगाची इच्छा बाळगणान्यांनी ज्योतिष्टोम यज्ञ केला पाहिजे. असे कर्मकांडाचे म्हणणे आहे. जीवाला ‘तू शाश्वत राहशील काय ?” असा श्रुतीचा प्रश्न आहे त्यानुसार जीवाच्या शाश्वत स्वरूपाचा विचार कसा करावयाचा हे पाहू या !

तुला स्वर्गाची इच्छा असल्यास ज्योतिष्टोम यज्ञ कर म्हणजे स्वर्ग मिळेल. ज्योतिष्टोम यज्ञाचे ‘स्वर्ग’ हेच फळ. स्वर्गप्राप्ति देहत्यागानंतर होते, ह्या मर्त्यलोकांत होत नाही. स्वर्गलोक हा एक निराळाच लोक आहे. त्या स्वर्गलोकांत राहून पुण्यफळ भोगून पुण्य संपताच मर्त्यलोकाची प्राप्ति होते, म्हणजेच पुन्हा मर्त्यलोकांत जन्मावे लागते. स्वर्गलोकात सुकृताचे फळ भोगिल्यानंतर हा लोक किंवा त्यापेक्षाही महान लोकांचा आश्रय घेतला पाहिजे. ‘तू मेल्यावर स्वर्गात जाशील’ असे म्हटल्यावर हा देह सोडला तरी तू आहेस, असेच ठरते व देहाच्या उत्पत्ति नाशाचा व तुझा काहीएक संबंध नाही हेच सिद्ध होते. एक देह सोडून दुसरा देह प्राप्त होत असल्यास ‘तूं’ असलांच पाहिजेस, नाही का ? ह्यावर केव्हाही अस्तित्वात असणाराच ‘तूं’ आहेस. ह्या लोकांचा तूं त्याग करणार असलास तरी ‘तूं’ मरत नाहीस असे श्रुतींनी स्पष्ट म्हटल्यावरून अमरत्वाचाच बोध होतो. स्वर्गाला जाणारा कोण ? मीच. देह नाश पावला तरी ‘मी’ चा नाश होत नाही. हा देह म्हणजे तूं नव्हेस.

कर्मामुळे जीव बंध पावतो तर विद्येच्या योगाने तो मुक्तता पावतो; हे कर्माचे रहस्य ओळखले म्हणजे कर्मकांडातील गर्भित हेतु ज्ञान प्रवृत्ती असून ते अज्ञानाचा कधीहि बोध करीत नाही, हे स्पष्ट होते. कर्म करताना ‘तूं’ असतोस; कर्म संपल्यावर त्या कर्माची फलरूपे भोगण्यास, अनुभवण्यास ‘तूं’ असतोसच. कर्म करताना, कर्म पूर्ण झाले तरी कर्माची फळे भोगताना, अनुभवताना तसेच ती नष्ट झाली तरी ‘तूं’ आहेस; सदोदित, सदासर्वकाळ केव्हांहि ‘तूं’ असतोसच असेच श्रुति सांगते. ह्यावरून श्रुति सतूरूप, नित्य, सत्तामात्र अशा स्वरूपाचाच बोय करते हे स्पष्ट आहे.

आता एक देह सोडून दुसरा देह प्राप्त करून घ्यावयाचा असल्यास त्यावेळी आत्म्याला कोणते अस्तित्व असते ते पाहू या !

आत्म्याने एक देह सोडला म्हणजे त्याचा आश्रय सुटला एवढेच, असे म्हटले म्हणजे दुसरा देह प्राप्त होईतो त्यास कोणताच आश्रय न राहता आत्मा आपल्याच अस्तित्वात राहतो, नाही का ? एक किनारा सोडून दुसऱ्या किनान्यास लागेपर्यंत मथल्या अवधीत समुद्रपृष्ठभागावर समस्थितीत राहावयाचे एवढेच ! त्याप्रमाणे एक देह सोडून दुसरा देह मिळेपर्यंत मध्यंतरात, त्या अवकाशात आत्माहि एका निर्विकार समस्थितीत असतो हे स्पष्ट होते.

नित्य निर्विकारी असणाऱ्याचे स्वरूपच ही सृष्टि जीव आपल्या अविनाशी अशा अस्तित्वानेच असतो हे स्पष्ट झाले आहे. आता आपण भोगासक्तीबाबत पाहू या !

कर्मकांडाचे विवरण भोगरूपात आहे असा आक्षेप घेतला जातो. पण नीट विचार केल्यास कर्मकांड भोगप्रद नाही, भोगासक्ति निर्माण करणारे नाही हेच सिद्ध होते. भोगवासनांनी जीव बद्ध होतो तर वैराग्यामुळे तो मुक्त होतो. भोगाचा त्याग केलेले मनच मुक्त होय. मन दोन प्रकारचे आहे. कामवासनांनी, भोगलोलुपतेने युक्त असे मन असेल तर तो जीव अशुद्ध, अपवित्र म्हटला जातो तर भोगवासना, विषयवासना ह्यांनी रहित असलेले मनच शुद्ध मन व शुद्ध मन असणाराच पारमार्थिक जीव, निर्विषयमनानेच मोक्षप्राप्ति होते म्हणून तुम्ही आपले मन रोज रात्रंदिवस निर्विषय करीत जा। हेच मोक्षाचे साधन । निर्विषयस्थितीच आत्मसाथक, हृदयांत घर करून राहिलेल्या सर्व विषय कामना जेव्हां संपूर्णपणे नाश पावतील तेव्हाच मोक्ष हाती येईल, तोच मोक्षाचा अधिकारी मन भोगवासनारहित होण्यासाठी यत्न करणे म्हणजेच मोक्षप्राप्ती करून घेणे असे श्रुति ठामपणे सांगते. मातेसमान असणारी श्रुति अहितकर, वाईट होण्यासारखा काही तरी उपदेश करील काय ? कर्मकांड सांगणारी श्रुति कर्मामध्ये, भोगात आसक्ति निर्माण करते हे म्हणणे अगदीच चुकीचे आहे. ‘स्वर्गप्राप्तीसाठी ज्योतिष्टोम यज्ञ करावा ह्या म्हणण्याचे तात्पर्य, तूं शाश्वतरूपी, तुझे स्वरूप कधीही नाहीसे न होणारे असल्याने तुला अशाश्वत भोगाचा काय उपयोग? अशा प्रकारे कर्मकांडापासून परमात्म्याच्या शाश्वतरूपतेला, अविनाशित्वाला, सतूरूपत्वाला प्रकट करणारे हे एक उदाहरण होय.

उपासनाक्रम म्हणजेच आवाहन आणि विसर्जन आवाहनापूर्वी आवाहन करणारा असतो व विसर्जनानंतरही विसर्जन करणारा असतो. आवाहनापूर्वी असणारा विसर्जनानंतरहि असणारच. भक्तीचे लक्षण प्रेमच नाही का ? प्रेम निर्माण होणे सुखासाठीच आहे ना! परमात्म्याच्या ठायी असणाऱ्या प्रीतीनेंच अत्याधिक आनंद होतो असेच भक्तियोगाचें निरूपण आहे. आजीला आपल्या नातवंडाच्या गुणांचे वर्णन, कौतुक हे करण्यांतच संतोष असतो. यामध्ये मूळ कारण प्रेमच, तसेच पति-पत्नी, माता-पुत्र, मित्र-मित्र !! ज्याच्याबद्दल जास्त प्रेम आहे त्याचा गुणानुवाद करणे,आपणाजवळील चांगले पदार्थ देणे, सुखसाधनाद्वारे प्रीति मिळविणें हे प्रीतीचे, प्रेमाचे लक्षण होय. भक्तिसुद्धा तेच सांगते.

भगवद्गीतेत ‘हे कौंतेया ! तूं जे कांही करतोस, जे कांही खातोस ज्याचा त्याग (होम) करतोस, जे कांही दान करतोस, जे तप करतोस, ते सर्व कांही मला तूं अर्पण कर’ असे श्रीकृष्ण परमात्म्यानी म्हटले आहे. हे कां करावयाचे ? तर प्रेम वाढविण्यासाठीच ! प्रीतिमध्ये आनंद हेच ध्येय असते, नाही का ? तात्पर्य परमप्रीतीस पात्र असणारा परमात्मा आनंदरूपातच प्रगट करतो, नाही का ?

प्रीती, प्रेम हे पदार्थावर नसून त्यापासून मिळणाऱ्या आनंदावर असते, देवता मारक असेल तर त्या देवतेबद्दल प्रेम निर्माण होणार नाही. म्हणूनच आनंदप्राप्तीच मोक्ष. आनंदासाठीच उपासना ! मोक्षासाठीच भक्ति ! आनंदापासून परमात्मा वेगळा झाला तर दुःखरूप अशा परमात्म्याची उपासना कोण बरे करील? म्हणून परमात्मा आनंदरूपीच आहे. ‘सुखासाठी परमात्म्याचा आश्रय घ्यावा,’ असे म्हटले जाते. प्रीतीसाठी विषय ठरलेली गोष्ट म्हणजेच सुखाची संवेदना, ज्याच्यापासून अधिकाधिक सुख मिळते तितकी अधिक प्रीति प्रेम वाढते. परमात्म्याची भक्ति एकदा निर्माण झाली की ती अधिकाधिक वर्धित होत जाते. ती कधीही नाहीशी होत नाही. ती आनंदातच एकरूप होते. असे असल्यामुळे उपासनाकांड आनंद हेच ध्येय ठेवते, नाही का ? तो वेगळा, मी वेगळा असे समजूं लागल्यास मनुष्यही इतर प्राण्यासारखाच. आता आपण हेच युक्तीने सिद्ध करू या!

‘जो कोणतातरी आनंद मिळविण्याची तूं अपेक्षा करतोस तो आनंदच ‘परमात्मा’ असे श्रुतिमाता दर्शविते. आवाहन-विसर्जनाचा विषय झालाच आहे. ‘परमात्म्यामध्ये आनंदच मात्र असल्याने तूंहि आनंदरूपी’ असे उपासनाकांडामधून श्रुति घोषित करते.

आता ज्ञानकांडाचा विचार करू या! ‘तमेव विदित्वा अतिमृत्युमेति’ ज्ञानस्वरूपाला ओळखले तर मृत्युसुद्धा जिंकता येतो. समजण्यापूर्वी असणाराच, समजल्यानंतरही असतोच, नाही का ? म्हणूनच त्या ज्ञानस्वरूपाला ओळखण्यानेच जीव मुक्त होतो. ‘ज्ञात्वा देवं सर्वपाशापहानि !’ परमात्म्याचे ज्ञान म्हणजेच परमात्म्याला ओळखणे. परमात्म्याला ओळखावयाचे, समजून घ्यावयाचे म्हणजे काय करावयाचे? तर सर्व पाशापासून मुक्त व्हावयाचे. त्यामुळेच ‘त्याला जाणून घे. त्यालाच शोध. तोच ब्रह्म होय. तो कसा आहे हे समजून घे.’ असे श्रुतीचे म्हणणे आहे.

ह्यावरून परमात्म्याला ओळखले पाहिजे हे सिद्ध झाले. अद्याप जो न समजलेला आहे तो समजण्यापूर्वी पण होता, समजण्यासारखे स्वरूप ‘मी’ असे समजल्यावरही तो आहेच; समजावयाची गोष्ट आपल्या स्वरूपाची जाणीव देऊन नष्ट झाल्यास तिचे नित्यत्व कसे बरे सिद्ध होईल ?

ज्या कोणाला समजवून घेऊन मुक्त होशील तो परमात्माच तूं. तूंच ‘तत्त्वमसि’ तुझे स्वरूप तुझ्याहून वेगळे नसलेल्या ज्ञानांचा साठा आहे, असे श्रुति सांगते. श्रुति सर्वाचे हित इच्छिते म्हणूनच ती श्रुतिमाता. ज्यामुळे अनहित होईल अशी गोष्ट ती कधीही सांगणार नाही. तिचे प्रत्येक बोल परतत्त्वाचाच बोध करतात. ह्या दृष्टीने कर्म, उपासना, ज्ञान ह्यापासून श्रुति परतत्त्वच समजवून देते हे योग्यच! ह्याविरुद्ध वेगळे असे समजावून दिले तर श्रुतीवर परतत्त्ववंचनेचा आरोप केला जाईल.

जागृतीत प्रत्येकास सतूरूपतत्त्वांचा अनुभव येतो. गेलो, आलो, सर्व करून दमलो, विश्रांती घेतो इत्यादिद्वारे जागृतीत स्वतःचे अस्तित्त्व स्फूट रीतीने स्पष्ट दिसते, समजते. स्वप्नात ‘मी’ हे ज्ञानरूप झालेले असते हे स्पष्ट आहे. स्वप्नात दिवे, चंद्र, सूर्य नसतात, उजेड नसतो, इंद्रिये नसतात. त्यामुळे हे जग दिसत नसते पण मनाद्वारे सर्व कल्पना करून निर्माण करून समजावयाचे असल्यास तेथे सूर्य नसतांना प्रकाश कोणी बरे दिला ? आत्मस्वरूपानेच नाही का ? स्वप्नात असताना दिसणारे जग कोणत्या इंद्रियाने पाहिले जाते ? तेथील ज्ञानात्मक व्यवहाराला कारण ‘मी’ नावाचा चिद्रूपी.

आता गाढनिद्रेचा अनुभव पाहू या! जागृतीत एक वेगळेच सुख प्राप्त करून घेण्यासाठी, त्याचा अनुभव घेण्यासाठी कष्टणारा स्वप्नात त्याची सृष्टी करून त्या विषयात सुख आहे म्हणून तडफडत असतो. पण सुषुप्तीमध्ये कशापासून आनंद मिळतो ? तेथे भावना असतात काय ? उपासना आहे काय? ध्यान धारणा आहे काय ? आनंदरूपी परमात्म्याने सुख दिल्यास तो तृप्त होऊ शकणार नाही काय ? मालकाने पगार दिल्यास नोकर सुखी होणार नाही असा विचार कधीतरी असेल काय ? पुसून जाणारी गोष्ट आपल्यापेक्षा बाहेरची, अन्य असे म्हटल्यावर समजलेले सर्व आपल्यापेक्षां बाह्य, अन्य आहे व निर्माण झालेला आनंद मात्र आपणच आहो असे सिद्ध होते. अशा प्रकारे ज्ञानकांड ‘तुझे स्वरूप नित्य आहे.’ अशीच घोषणा करते.

‘तूं परमात्म्यापासून उत्पन्न झालास उदयास आलास.’ असे म्हटल्यावर तुझे पूर्वरूप परमात्माच नाही का ? परमात्मा कधी तरी वेगळा, निराळा होईल काय ? हा भ्रम, अज्ञान नाहीसे करणे, घालविणे हाच श्रुतिचा उद्देश ! ह्यासाठीच ‘तूंच तुझे शुद्धस्वरूपच परमात्मा ! तुझ्या दुःखाला इतर दुसरे कारण नसून, परमात्म्यापासून मी वेगळा आहे अशी भावनाच दुःख निर्माण करते.’ असे श्रुति सांगते.

श्रुति-युक्तीने हे वर्म जाणून घेऊन ह्या क्षणीच ‘मी व परमात्मस्वरूप वेगळे नाही’ अशा निश्चयाने ह्या शाश्वत सुखासाठी प्रयत्न करून तुम्ही सर्वजण कृतकृत्य व्हा ! असा मी आशीर्वाद देतो.

ॐ तत्सत्!

home-last-sec-img