Literature

ज्येष्ठ वद्य चतुर्थी

राजकीय कोलाहलामुळे द्वेष, असुया ही वाढु लागली आहेत. राज्यकर्तेही धर्मसुत्र तोडुन समाजास उच्छृंखल प्रवृत्तीकडे प्रवृत्त करीत आहेत. असे असल्यामुळे इहलोकी सुख नाही, परलोकी तर नाहीच नाही. विषयलालसा मानवास अधोगतीलाच नेते.

दैवी सामर्थ्यामध्ये अपार शक्ती आहे. भगवान अपार शक्तिमान असुन धर्मप्रिय आहे तो जर धर्माचरणाने संतुष्ट झाला तर तो आपणांस शक्ती- सामर्थ्य देतो. असे असल्याने धर्म विसरून देवास न जुमानता हे लोक कोणते सुखसासर्थ्य मिळवण्याकरता प्रयत्न करतात ? परस्व अपहार, परहिंसा, अभक्ष्यभक्षण, अपेयपान, अगम्यगमन, द्युत, चोरी, खुन, मारामाऱ्या हे सर्व प्रतिदिनी वाढत असल्याचे कारण काय ? तर या सर्वांचे कारण धर्मच्युतीच होय. धर्मवृक्ष उन्मळून पडल्यावर त्याच्या आश्रयाने राहणारी वानरे वगैरे भुमीवर पडल्यास त्यात आश्चर्य कोणते ? आत्मशक्ती नष्ट करून घेतलेल्या अशा वानरांना आत्मरक्षणाचे कोणतेच साधन रहात नाही.

भगवान धर्माभिमानी असून त्यांचे सामर्थ्यही महान आहे. तो अनंत व सर्वव्यापी आहे. माझ्या-तुमच्यात असुनही तो सर्वव्यापी आहे. तो धर्मप्रिय आहे. धर्मस्वरूप आहे व धर्मोध्दारकही आहे. धर्माचरणाने तो प्रसन्न होतो. तो प्रसन्न झाल्यास तुमचे सर्व इष्टार्थ सिध्द होतात आणि सर्व सुखेहि मिळतात. तसेंच सर्व दुःखेही नष्ट होतात.

श्री प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img