Literature

ज्येष्ठ वद्य चतुर्दशी

ढगाच्यामुळे सुर्यप्रकाश मलीन दिसतो म्हणजेच सुर्यप्रकाश मलीन भासमान होतो. पण ढग नाहीसे झाल्यावर सर्व पुर्वीप्रमाणेच होते. ढग असताना मलीन दिसणारि सुर्यप्रकाश व सुर्य हे खरोखरच मलीन आहेत काय ? तद्वत मायेच्या आवरणाने नारायण मलीन भासत असला तरी वस्तुस्थिती तशी नाही. ज्याप्रमाणे ढग सुर्यास स्पर्श करू शकत नाहीत, त्याप्रमाणे मायेचे व्यवहार परमात्म्यास चिकटूं शकत नाहीत. आपल्या दृष्टीने ढगासारखीच माया होय. आनंदस्वरूपी परिपूर्ण, स्वप्रकाशी अशा परमात्म्याचे स्वरूप प्राप्त करून घेणे हेच आपल्या जन्माचे इतिकर्तव्य व सार्थक होय. सर्वत्र व्यापलेल्या आत्मस्वरूपी परमात्म्यास समजून घेणारे ‘ धीर ‘ होत व त्यांना शाश्वत सुख प्राप्त होते. इतरांना ते सुख कधीही मिळणार नाही. मन व वाणीने वर्णन करण्यास अशक्य असलेला परमात्मा सर्वांच्या अंतःकरणात ‘ अहं ‘ म्हणजे मीपणाच्या जाणिवेस आश्रयभूत होऊन प्रकाशांत असून तोच ब्रह्मस्वरूप होय.

श्रुतींनी असें म्हटले आहे की, ‘ अहं ब्रह्मास्मि | आनन्दात्मा | आनन्दो ब्रह्म | ‘ विवेकामुळे झालेली मीपणाची जाणीव म्हणजेच ब्रह्म, आत्मा आणि आनंदस्वरूप आनंद म्हणजेच ब्रह्म. मानवाच्या अंतःकरणात स्फुरण पावणारी मीपणाची जाणीव देहाच्या ठिकाणी असतां कामा नये. अंतःकरणात मीपणाची जाणीव असल्याखेरीज कोणतीच गोष्ट होणार नाही. बाह्यवस्तु पहाणे, शब्द ऐकणे व सर्व समजून आणि समजवून घेणे या सर्व गोष्टी मीपणांतच आहेत.

श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img