Literature

ज्येष्ठ वद्य द्वितीया

पाश्चात्यांनी आपणामध्यें इंग्रजी भाषेचा अभ्यास केलाच पाहिजे अशी बुध्दी निर्माण केली. त्यामुळे आपली संस्कृती ज्या संस्कृत भाषेंत लिहिली गेली ती भाषा मृतावस्थेच्या स्थानाला पोहोंचली आहे. आपल्या लोकांनी आपल्याजवळ असलेला सर्व पैसा खर्च करून आपल्या मुलांना इंग्रजी भाषा शिकवण्यास सुरूवात केली व आपल्याजवळील सर्व पैसा घालविल्यावर खर्चासाठी कांहीतरी मिळविले पाहिजे याकरतां ते नोकरीच्या मागे लागले. नोकरीमुळे पाश्चात्यांच्या हाताखाली त्याच्या संसर्गातच दिवसाचे बारा तास घालविल्यामुळे त्यांचे अनुकरण करणें अनिवार्य होऊन बसले. त्यांच्या आहारविहारांची आवड निर्माण झाल्यानें आपले लोकहि पाश्चिमात्याप्रमाणेंच वागूं लागल्यानें आपली धर्मकर्मे नष्ट झाली. आपले आचारविचार नाहिसे झाले व पाश्चिमात्यांच्या अनुकरणानें आपले लोकहि नाहिसे झाले व पाश्चिमात्यांच्या अनुकरणानें आपले लोकहि अपानपेय, अभक्ष्यभक्षण करूं लागले.

सरकारी नोकरीत सदाचारास वाव कमीच. अशांचे आचारविचार, वेष भाषा हे सर्व बदलून जातात. मनोवृत्तिहि बिघडते. धर्मकर्मात अनादर उत्पन्न होतो. आपल्या संस्कृतीस क्षीणता प्राप्त होते. पूर्वाचाराप्रमाणें क्रमानें असलेल्या आपल्या त्रिकाळस्नान, संध्या, नित्य पंचयज्ञ, नैमित्तिक होमहवन इत्यादि कर्मासाठी नोकरीमुळे वेळच मिळत नाही. जीवनकलहासाठी कालक्षेप करावा लागणाऱ्या या लोकांना अध्यात्मिक विचारासाठी वेळच उरत नाही.

श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img