Literature

ज्येष्ठ वद्य पंचमी

‘ हा संसार अनित्य, असार, विनाशी, दुःखकारक असल्यामुळे भगवत्स्वरूपाची ओळख करून घेऊन त्याची आराधना करा !’ असा आपल्या सनातन धर्माचा उपदेश आहे. ‘इहलोकी मानवजन्मास येऊन सदाचार प्रवृत्ती बाळगून सध्दर्मनिरत होऊन जीवन कंठा. परमात्मज्ञानाचे साधनरूप असलेले तत्वज्ञान व विचार यांचे मनन करून ते समजवून घ्या.’ हेंच धर्माचरणाचे सार होय. ‘दुसऱ्याची हिंसा करून पापाचे धनी होऊ नका.परस्व अपहार करून दुःखाचा भार वाढवून घेऊ नका. केवळ विषयोपभोगाने कालक्षेप करणे हितकर नव्हे. जगांतील सर्व व्यवहार मिथ्यारूप आहेत. त्यांचा आधार मनोविलासच होय. संसारामध्ये तिळमात्रही सुख नाही. असा जो गुरूपदेश आहे तो विसरू नका.

सुषुप्तीत कोणतेही दुःख नसून सुखस्वरूच असते हे सुखच आत्म्याचा धर्म होय. त्यालाच आत्मसुख म्हणतात. स्वप्नांत एखादे वन पाहून आपण आनंदीत होतो. त्याचप्रमाणे तेथील फुले, फळे पाहून मनास संतोष होतो. पण प्रत्यक्षांत तेथे वन नसते व त्यामुळे त्यातील फुले फळेही नसतात. हा सर्व भावनेचा खेळ आहे. त्या स्वप्नाप्रमाणेंच हे जग व जगांत असलेली विषयसुखे ही केवळ स्वप्नातील आभासच होय.

‘विश्व दर्पणदृश्यमाननगरीतुल्यम् |’ असे ज्ञानी म्हणतात. सिनेमामध्ये काही सुंदर दृश्ये दिसून नाहीशी होतात. चित्रांत दिसणारा पैसा अडका आपल्या हातांत येत नाही.या जगताचा साक्षीभूत असलेला परमात्मा एकमेव, सत्य, नित्य आहे. त्याला प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करा !

श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img