Literature

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी

परमात्म्याने चौऱ्यांशी लक्ष योनीची सृष्टी उत्पन्न केली असून त्यातील उपयुक्त अशी मानवयोनी आपल्याला प्राप्त झाली आहे हें आपल्या सृकृताचेच फळ होय. आपणास विवेकहि दिला आहे. जन्माचें सार्थक करून घेण्यासाठी अनुकुल अशा आज्ञा श्रुति-स्मृतींनी आपणास केल्या आहेत. आपण त्यांचे योग्य प्रकारे पालन केले पाहिजे. त्या परमात्म्याच्या प्रेमळ हांकेस आपण ‘ ओ ‘ दिली पाहिजे. पुन्हा पुन्हा दुर्मार्गप्रवृत्त होऊन पापजीवी होण्याचा प्रयत्न करणें हा अविवेकाच नाही काय ?

परमात्मा ‘ अमृतस्य पुत्राः ‘ असें आपल्याला उद्देशून म्हणतो व ‘ प्राप्य वरान्निबोधत ‘ असा उपदेश करतो. माझ्या मानवी भक्तांनो ! माझे यथार्थ स्वरूप ओळखा. सद्गुरूचा आश्रय प्राप्त करून त्यांच्या उपदेशाच्या सामर्थ्यानें तुम्हाला माझ्या स्वरूपाचे ज्ञान होवो. त्यामुळेच तुम्हास अमरत्व प्राप्त होईल व सर्व दु:खाचा परिहार होऊन तुम्ही या प्रपंचसागरांतून तरून माझ्यात विलीन व्हा ! ‘ असें त्या परमात्म्याचें अभयवचन आहे. पण यावर आपण विश्वास ठेवतो काय ? त्याच्या आज्ञेनुसार आपण वागतो काय ?
आपणांस सत्य समजावे अशी परमात्म्याची इच्छा असल्यामुळे आपल्याला हें मानवी शरीर प्राप्त करून देण्याची त्याने कृपा केली आहे. आपले शरीर अस्थिमांसादी क्षुद्र वस्तूनीं निर्माण झाले असून मलमूत्रादी द्रव्यांनी युक्त व शोकादींचे आश्रयभूत असून शेवटी संपूर्णपणे नाश होणारे आहे हें निश्चितच.

श्री प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img