Literature

ज्येष्ठ शुद्ध द्वितीया

एखाद्या दारूड्यास दारु पिण्याची श्रध्दा उत्पन्न होऊन तो पूर्ण दुर्व्यसनी बनला तर तो त्यातच अत्यासक्त होतो. परमात्म्याच्या ठायी निष्ठा बाळगून रात्रंदिवस नामसंकिर्तनात गर्क होऊन त्यांतच मनुष्य रममाण झाला तर तेंच परमसुख होय असें त्यास वाटते. म्हणून सुरापानानें सुख मिळते की परमात्म संकीर्तनानें सुख मिळते हे ज्यांचे त्याला माहित. पण यावरून सुख म्हणजे काय व दुःख म्हणजे काय याचा उलगडा होऊन आपले इप्सित प्राप्त झालें नाही तर दुःख हें उघड ठरते.

आपण निद्रेत असतांना आपणांस कोणत्याच वस्तूंचा मोह होत नाही. त्याचप्रमाणे मरणानंतरहि कोणताच मोह शिल्लक रहात नाही. सर्व कांही येथेंच शिल्लक रहातें. या सर्व गोष्टींचा नीटपणे विचार केल्यास प्रापंचिक सुखसामुग्रीची किंमत लक्षात येते.

आवडणारी, प्रेम उत्पन्न करणारी वस्तू सुखकर होय, तर अप्रियता निर्माण करणारी वस्तू किंवा पदार्थ दुखःकर होय. परंतु सर्वांच्यामध्ये वास करून राहणारे ब्रम्ह मात्र शाश्वत- सुखस्वरूप-निदर्शक आहे. त्यांच्या खेरीज इतर सर्व वस्तू दुखःकारक होत असे वेदांतशास्त्र कंठशोष करून सांगते.

‘ आत्मा प्रियतमः ‘ सर्व संग परित्याग करून आत्माच प्रियतम आहे असे समजून घेणे म्हणजेच आत्मस्वरूपज्ञान
होय व म्हणूनच आत्मा प्रियकर, हितकर व सुखदायक आहे.

श्री प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img