Literature

ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा

घरदार, धन, कनक, पत्नी, मुले, बांधव यापैकी कोणीही आपल्याबरोबर येणार नसून आपल्याकडून केली जाणारी पापपुण्येच आपल्या भावी मार्गासाठी उपयोगी पडणारी शिधासामुग्री आहे आणि परमात्म्याचा अनुग्रह प्राप्त करणे हेच आपल्या जन्मसार्थकतेचे साधन होय अशी जाणीव सन्मार्गियात होत असते.

माणसाच्या आवतीभोवती ज्या प्रापंचिक वस्तु, स्त्री, मुले आदि असतात. त्यांच्यासंबंधी असणारा मोह जर परमात्म्याच्या ठिकाणी उत्पन्न झाला तर तो मनुष्य पुनित झाला असे म्हणावे लागेल. सन्मार्गसाधनेमध्ये परमार्थ साधनासाठी प्रवृत्त व्हावयाचे असल्यास त्याला त्याचे पूर्वसुकृतच उपयोगी पडते, किंवा सद्गुरूदर्शन घेऊन सदुपदेश प्राप्त करणे आवश्यक आहे. असे झाले तरच मनुष्य प्रापंचिक तापत्रयापासून मुक्त होतो.

मन मर्कट स्वभावी आहे. त्याला मारून मुटकून सन्मार्गप्रवृत्त केले पाहिजे. परोपकार, परमात्मसेवा, सदाचार, ही सुखमार्गाकडे नेणारी साधने होत.

मनुष्याचे मन घडविण्यासाठी कर्म, अवस्था, देश, काल ही सर्व कारणीभूत आहेत. सत्कर्माचरणानेच त्याला त्यात अभिरूचि उत्पन्न होऊ शकते. मनाची श्रध्दा ही कर्माचा मूलाधार होय. कारण जो ज्याच्याप्रमाणे श्रध्दा ठेवतो तीच वाढवीत वाढवीत तो त्या श्रध्देतच सुखप्राप्ती करून घेतो.

श्री प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img