Literature

तेव्हांच जग पावन होईल

‘As you become a reformer, you become a deformer’ रामतीर्थ म्हणत. अलीकडच्यांची सुधारणा म्हणजे पाश्चात्य संस्कृतीचे आचारविचार भारत देशांत आणूं पाहणे अथवा नास्तिकवादांत पुढे सरसावणें. आधुनिक सुधारक वर्गाला देवधर्म, पुनर्जन्म, लोकांतरगमन, स्वर्गनरक, श्राद्धपक्ष, त्याम हे सर्व योतांड वाटून आपल्या मनाप्रमाणे लोकांना तयार करण्याचा प्रयत्न करतात. ऐहिक देहसुखापेक्षां पलीकडील विचार काहींच्या डोक्यांतच येणे दुरापास्त. आले तरी कृतींतून दिसून येणे फार कठीण. किंवा आपल्याला ते अशक्यच असे स्वतःच्या बाबतीत त्यांनी ठरविलेले असते; व आपल्यासारखेच सर्वांनाहि तें तसेंच असेल या कल्पनेनें आपला संप्रदाय अशाच पद्धतीने निरंकुश करून दृढ करावा म्हणून ते प्रयत्न करतात. अलीकडची राज्यशासन पद्धति या विचाराचीच अधिक दिसून येते. अग्नीला वाऱ्याचे साहाय्य मिळाल्यासारखे झाले आहे. कालमानानें, परभाषेच्या शिक्षणानें, त्यांच्या शास्त्रीय अभ्यासानें, त्यांच्या प्रचारकांच्या प्रयत्नानें, धर्मभ्रष्ट करणाऱ्यांच्या ध्येयानें, त्यांच्या संस्कारांत वाढल्याने, त्यांच्या देशांत राहून आल्याने व त्यांच्या राजशासनांत शेकडों वर्षे काढल्याने आधीच धर्मप्रवृत्ति कमी, अधर्मा कडेच अधिक प्रवृत्ति झाली आहे. त्यांतून सरकारहि या पक्षाचेच झाले तर मग काय विचारतां राष्ट्रांत किती बेबंदशाही माजावी तितकी माजते !

मनुष्यप्राण्याच्या उत्पत्तीबरोबरच भारतभूमि तत्त्वज्ञानाची व त्याला अनुकूल अशा आचारविचारात्मक धर्माची जन्मभूमि आणि जीवनभूमि होऊन आहे. आधुनिक कोणत्याहि पद्धतीचे निरीक्षण परीक्षण करून शेवटी भारत वर्षाची पद्धति आणि परंपरा इतकी निर्दृष्ट, इतकी क्रमबद्ध, इतकी सुसंगत आहे की त्याची बरोबरी जगांतली इतर कोणतीहि पद्धति परंपरा करूं शकत नाही असे कोणालाहि विचाराअंती सहज आढळून येईल. आपापला दुराग्रह सोडून जगांतल्या सर्व पद्धति व परंपरा आर्य संस्कृतीच्या या गंगाप्रवाहास मिळून एकरूप होतील तेव्हांच सर्व जग पावन होईल.

home-last-sec-img