Literature

दानाचे महत्त्व

अन्नदानाचे महत्त्व फार आहे. अन्नदान म्हणजे एक जीवनदानच आहे. प्राणी भुकेनें कासावीस होतो व अगदीं लाचार बनतो. धन आणि धान्य यांची जोडी आहे. मनुष्याला दोन्हींचीहि अति आवश्यकता असते हें बोलून दाखवावयालाच नको. अन्नं प्राणमुत जीवातुमाहुः । अन्नच प्राण, अन्नच जीवन. अतिशय कडकडून भूक लागली असतां केव्हां दोन घांस अन्न खाईन असें होतें. डोळ्यांना अंधारी येते, प्राणांतिक समय वाटतो. भुकेनें जीव अतिशय व्याकुळ होतो. कधीं कधीं अतिक्षुधेनें मूर्छा सुद्धां येते. एकंदरींत क्षुधेचा तो माध्यान्हसमय म्हणजे एक प्रलयकाळच होय. देवानें भूक एक अनुभवावयाला लावून, प्राण्यांना प्राणांतिक वेदनांचा अल्पसा परिचयच करून दिला आहे. वेळेवर अन्न न मिळाल्यास प्राण कासावीस होऊन मेल्याचींहि उदाहरणे आहेत. दारांत आलेल्या क्षुधिताला अमृतोपम अन्न घालून जो ही क्षुधाज्वाला शांत करतो व नवजीवन देतो तोच खरा दाता होय. सर्व दात्यांत अन्नदात्याची योग्यता मोठी. असहाय दीन जनांच्या क्षुधेची ज्याला कल्पनाहि येत नाहीं, दीन होऊन, तोंड वेंगाडून, केंविलवाण्या शब्दानें, हात तोंडाकडे नेऊन, अन्नाची याचना करणाऱ्याला पाहून, ज्याचें हृदय पिळवटून येत नाहीं, त्या दीन याचकाला, चांगल्या प्रकारची अनुकूलता असूनहि, जो अन्न देत नाहीं, त्याला पाहून दयेनें लौकर वाढण्याऐवजीं जो त्याच्यावर वसकन रागावतो, क्षुधित व्याघ्राप्रमाणे त्याच्यावरच तुटून पडतो, अपशब्द बोलून व दंडाला धरून, त्याला जो बाहेर हांकून लावतो, अन्नार्थी दीन क्षुधिताविषयी आपलें हृदय इतकें पाषाणवत् कठोर करतो, ऐन माध्यान्हकाळी दारीं उभा राहिलेल्या क्षुधित अतिथीची विचारपूसहि न करतां दार लावून, आपण मात्र आंत एकटा व्यवस्थितपणे बसून, आग्रह करकरून वाढत असलेलें मिष्टान्न, अति आनंदानें (व आढयतेनें ) आकंठ जेवतो, त्याला त्या

क्षुधित याचकांचा व अतिथींचा तळतळाट लागतो. यांच्या या क्षुद्बाधेचा परिचय, त्याला त्याच्या प्राणान्तकाळी यम करून देतो. त्याचे अन्नान म्हणून प्राण जातात. कर्म करतांना तो हंसत करतो, पण त्याचे परिणाम भोगतांना मात्र रडत भोगतो. याहूनहि अधिक शिक्षा त्याला त्या यमपुरीत भोगावी लागते. अन्नदात्याचे अन्न असो वा धनदात्याचें धन असो, तें सत्पात्रीं दान केल्याने कधी कमी न होतां उलट वाढतेंच. त्याला परमात्मा आणखी अधिक देतो. ‘ द्यावें तसे घ्यावें, ‘ अशा न्यायाच्या या जगांत जो दुसऱ्याला देत नाही त्याला दुसऱ्यापासून मिळत पण नाही. ‘करावें तसे भरावें.’ त्यानें इतरांच्या बाबतीत केल्याप्रमाणेच त्याच्या कष्टकाली, त्याला इतर लोक करतात. त्याच्याशी एखादा शब्द बोलावयालाहि कोणी तयार नसतो. कोणीहि त्याला असा भेटत नाही कीं, जो त्याची कीव करील. ऋग्वेदांतल्या ‘धनान्नदान’ सूक्तांत अशा तऱ्हेचा विषय आला आहे.. यांपैकी कांही मंत्रांचा इथे विचार करूं.

न वा उ देवाः क्षुधमिधं दगुरुता शितमुपगच्छन्ति मृत्यवः । 

उतो रविः पृणतो नो-पदस्यत्युताषृणन् मर्डीतारं न विन्दते ॥ १ ॥ (ऋ. १०|११७) 

-भूक नव्हे मुकेच्या रूपानें, प्राण्यांचा वधच देवानें केला आहे. मुकेच्या रूपाने साक्षात् मृत्युच क्षुधिताकडे येत असतो. दारीं आलेल्या अशा सुधिताला जो अन्न देत नाही, त्या क्षुधिताच्या प्राणासारखेच त्याचेहि प्राण, एक दिवस तो यम घेऊन जातो. दात्याचें धनधान्य कधी कमी होत नाही. जो दुसऱ्याला धनधान्य न देतां आपणच उपभोगितो त्याला जगांत कोणी आप्त मिळत नाहीं, सुखाचा शब्दहि कोणी त्याच्याशी बोलू इच्छीत नाहीं.


य आधाय च कमानाय पित्वोऽनवांस्त्वरफितायोपजग्मुषे । 

स्थिरं मनः कृणुते सेवते पुरोतो चित्समर्डितारं न विन्दते ॥ २ ॥

– भुकेनें व्याकुळ होऊन ‘देहि ‘ म्हणून दाराशी उभा राहिलेल्या दोन याचकाला, जो दुरुत्तरानें अधिक व्यथित करतो; अशा भुकेनें कासावीस होत असलेल्या केविलवाण्या याचकाबद्दलहि, जो मन कठोर करतो; पाहिजे अनुकूल असतांहि अशा याचकांना त्रासवून व अनेक प्रकारें व्यथित करून, रेन माध्यान्हाच्या वेळींहि त्यांना कांहीं न देतां, त्यांच्यापुढे आपण मात्र पोट

भरून सुग्रास अन्न खातो; त्या क्रूर पाप्याला जगांत कोणी सुखदाता मिळत नाहीं व अंती अनेक यमयातना भोगाव्या लागतात.

स इद भोजो यो गृहवे ददात्यन्न कामाय चरते कृशाय । 

अरमस्मै भवति यामहूता उता परीषु कृण॒ते सखायम् ॥ ३ ॥

– भुकेनें व्याकुळ होऊन अन्नाच्या इच्छेनें, दाराशी आलेल्या कृश अतिथ्याला, जो मृदुमधुर भाषणांनी गौरवून, सुग्रास अन्नानें संतुष्ट करतो, तोच खरा दाता व तोच खरा गृहस्थाश्रमी त्याला यज्ञाचें संपूर्ण फळ मिळतें, धन धान्याची समृद्धि होते. तो आपल्या शत्रूंनाहि मित्र करूं शकतो. जाईल तिथे त्याचा गौरव होऊन त्याला कांहीं कमी पडत नाहीं; तो लोकप्रिय व लोक मान्य होतो. इथे उत्तम कीर्ति संपादून आत्मज्ञानानें अंत मुक्त होतो.

पृणीयादिनाधमानाय तव्यान् द्राधीयांस-मनुपश्येत पन्थाम् । 

ओहि वर्तन्ते रथ्येव चक्राऽन्यमन्यमुपतिष्टन्त रायः ||५||

— धनाढ्याने याचकांना धनदान अवश्य करावें. धनधान्याचे द करणाऱ्याला आपोआपच सर्वांत श्रेष्ठ असा मोक्षमार्ग दृग्गोचर होतो. धांवणाऱ्या रथाच्या चक्राप्रमाणें धनधान्यादि संपत्ति, एक वेळ एके ठिकाणी तर दुसऱ्या वेळी दु ठिकाणी जात असते. अशा अशाश्वत संपत्तीचा भरवसा न बाळगतां, अनुकूल असतांनाच जो दानधर्म करून आपल्या जन्माचें सार्थक करून घेतो तो धन्य, असें श्रुतीचें सांगणे आहे.

मोघमन्नं विन्दते अप्रचेताः सत्यं ब्रवीमि वध इत् स तस्य । 

नार्यमणं पुष्यति नो सखायं केवलाघो भवति केवलादी ||६|| (ऋ. १० ११७ धनान्नसूक्त )

—ज्याचे मन इतकें उदार असत नाही, त्यानें विनाकारण गृह धनधान्यांचे संपादन केलें असें समजावें. अशानें मिळविलेलें सर्व धनधान्य व्यर्थच होय. खरें सांगावयाचें म्हणजे, दानाशिवाय असलेला हा त्याचा धनधान्यसंग्रह, त्याला ( अनेक प्रकारानें ) मृत्युरूपच होतो. जो आपल्या धन धान्यादिकांनीं देवदेवता, मातापिता, इष्टमित्र, दीनदुबळे, गोरगरीब, अतिथि यांना तृप्त करीत नाहीं; जो केवळ आपल्यापुरतेंच पाहातो; तो, अन्न नव्हे त्या अन्नाच्या रूपानें, केवळ पापच भक्षण करतो असे समजावें.

तैत्तिरीय भृगुवल्लींतहि अन्न आणि अन्नदान यांचे महत्त्व सांगितलेलें आढळतें.’ अन्नं न निंद्यात् ‘अन्नाची निंदा करूं नये. ‘अन्नं न परिचक्षीत अन्नाचा तिरस्कार करूं नये.’ अन्नं बहु कुर्वीत :– अन्नाचा म्हणजे धान्याचा पुष्कळ संग्रह करावा.

न कंचन वसतौ प्रत्याचक्षीत । तद्वतम् । तस्माद्यया कया च विधया बव्हनं प्राप्नुयात् । अराध्यस्मा अन्नमित्याचक्षते । (भृगु. १०) –कोणी परस्थ जर वसतीला घरीं आला, तर त्याला पावसांत, थंडीत, उन्हांत, तसेंच उभें ठेऊन नुसती कोरडी चौकशीच करीत, त्याला त्रस्त न करतां त्याच्या त्याच्या अधिकारानुसार आदरातिथ्य करावें. एकदम नाहीं म्हणून अंगावर धांवून जाऊं नये; किंवा अर्धचंद्र देऊं नये; किंवा त्याला टाळण्यासाठी घरांतून स्वतः पाय काढू नये. घरीं आलेल्यांशीं आदराचें व प्रेमाचें वर्तन ठेऊन, अन्नोदकांनी आतिथ्य करणें, हें एक ‘ गृहस्था ‘ चें व्रतच आहे. अशा रीतीनें आलेल्या अतिथींना व गोरगरिबांना लागतें म्हणून आधीच या अन्न दानाकरितां, गृहस्थांनीं नाना तऱ्हेच्या धान्यादिकांचा संग्रह करून ठेवलेला असला पाहिजे. घरीं आलेल्यांना सत्कारून, आदरानें, ‘भोजन करूनच जावें,’ म्हणून म्हणत असले पाहिजे. माध्यान्हीं भोजनाच्या वेळींच आल्यास, • स्वयंपाक सिद्ध झाला आहे, उशीर नाही, जेवूनच जा’ म्हणून ठेवून घेत असले पाहिजे. हा आर्याचा प्रघात आहे. अतिथिसत्कार, आल्यागेल्याचे आदरातिथ्य व अन्नदान, भारताच्या, आर्य संस्कृतीच्या व सनातन धर्माच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी वैशिष्ट्य आहे.

एतद्वै मुखतोऽन्न, राद्धम्। मुखतोऽस्मा अन्न राज्यते ॥एतद्वै मध्यतोऽन्न राद्धम् । मध्यतोऽस्मा अन्न ँ राध्यते ॥ एतद्वा अंततोऽन राद्धम् । अंततोऽस्मा अन्न ँ राध्यते ॥

— सिद्ध झालेले अन्न अतिथीला योग्य सत्कारपूर्वक द्यावें. आपल्या घरीं कोणी आलें असतां, त्याला जितक्या प्रेमानें व सत्कारानें जो जेवूं घालतो, तितक्याच प्रेमानें व सत्कारानें त्यालाहि गेल्या ठिकाणी, दुसरे जेवूं घालतात. त्यानें मध्यम प्रतीच्या सत्काराने दुसऱ्याला अन्न घातलें, तर त्यालाहि इतरां कडून तसेंच घडते. अति तुच्छतेनें व तिरस्कारानें अतिथीला अन्न दिल्यास, दुसरेहि त्याला त्याप्रमाणेंच अन्न देतात. दुसऱ्यास जसें करावें, तसेंच दुसऱ्या कडून परतपावतीनें लाभतें. आपण दिल्याप्रमाणेच दुसऱ्याकडूनही आपणास प्राप्त होते हैं कोणीहि विसरूं नये. क्रिया आणि प्रतिक्रिया, उलट त्याच प्रमाणांत परत मिळतात. आपल्या ध्वनीप्रमाणे प्रतिध्वनि येतो. “पेरिलें तें उगवतें । बोलण्यासारखें उत्तर येतें । ” हें तत्त्वच इथे दाखविलें आहे.

स्वर्णकं प्राणरूपकम् अन्नाच्या खालोखाल दुसरें दान म्हणजे द्रव्यदान होय. हे सुद्धा प्राणरूपच म्हणून सांगितले आहे. दक्षिणायन्तोऽमृतं भजन्ते ।। (ऋ. १-१२५-६) ऋग्वेदांत, ब्राह्मणांना दक्षिणा देऊन सत्कार करणारे, अमृतत्व मिळवितात असे सांगितले आहे. एतत्खलु वाच तप इत्याहुर्यत्स्वं ददातीति । (तै. सं.) या मंत्राचा भावार्थ पाहू. देश, काल आणि पात्र पाहून, सत्कारपूर्वक व शुद्धबुद्धिपुरःसर, प्रतिफलाची आशा न ठेवता दिलेलें दानच खरें दान. हेंच गृहस्थाचे मोठे तप होय. असा या मंत्राचा भावार्थ आहे.

home-last-sec-img