Literature

दैव

श्रीरामानें लक्ष्मणाचे सांत्वन करण्याकरितां त्याला नाना तऱ्हेनें उपदेश केला, त्या अनेक प्रसंगांपैकी हा एक प्रसंग आहे.

जानासि हि यथा सौम्य न मातृषु ममांतरम् । 

भूतपूर्व विशेषो वा तस्या मयि सुतेपि वा ॥ १७ ॥ सोऽभिषेकनिवृत्त्यर्थैः प्रवासार्थैश्च दुर्ववैः ।

उग्रैर्वाक्यैरहं तस्या नान्यद्दैवात्समर्थये ॥ १८ ॥

( वा. रा. अ. स. २२ )

लक्ष्मणा, पाहा ! तुला माहीत असलेलीच ही गोष्ट आहे. माझ्यांत आणि कैकयींत अथवा माझ्यांत आणि भरतांत कोणत्याहि गोष्टीवरून मतभेद म्हणून कसला तो आजपर्यंत झाला नाहीं. भरतावर आणि माझ्यावर कैकेयीचें सारखेच प्रेम होतें. असें असतां त्याच कैकेयीचा, मला पट्टाभिषेक होऊं नये, मी अरण्यांतच जावें व भरतालाच पट्टाभिषेक व्हावा, याविषयींचा आग्रह पाहा! याला काय म्हणावे ! तिच्या वात्सल्याचे वर्णन करणे शक्य नाही. कैकेयीहि सामान्य नाही. ती सर्व धर्माधर्मविचार जाणते. अशा थोर स्त्रीचे आपल्या पती पुढे एखाद्या सामान्य हटवादी स्त्रीप्रमाणे वागणे आणि बोलणें व सापत्नभावानें माझ्या ठिकाणी इतका अभूतपूर्व द्वेष बाळगणे बघितलें, म्हणजे दैवी विचित्रा गतिः । असे म्हणण्यापलीकडे, लक्ष्मणा, दुसरे कांहीहि म्हणणे शक्य नाही. देवासुरसंग्रामाच्या वेळी कैकेयींच्या साहाय्यावर संतुष्ट होऊन तिला दिलेले वरच अशा तऱ्हेनें पुढे आपल्याला बंधनकारक होतील हे दशरथ महाराजांच्या ध्यानीमनींहि नव्हते. कैकेयीलाहि त्यावेळी ही भावना आली नव्हती. आतां हें सर्वहि असे जुळुन यावे म्हणजे हे दैव नव्हे तर काय, लक्ष्मणा !

home-last-sec-img