Literature

पौष वद्य दशमी

या विश्वरूपी पडद्यावर आपल्या संकल्पाने निरनिराळी चित्रे रंगवून परमात्मा चलचित्ररूपी नाटक दाखवितो. विवेकी मनुष्य यातील सुखदुःखाचा भागीदार होत नाही. उत्पन्न केलेली अनेक दृश्ये व निरनिराळ्या लोक व्यवहारातून आपली करमणूक व्हावी म्हणूनच हे चलचित्र परमात्म्याने आपल्या कल्पनेने निर्मिले आहे. ती चित्रे पाहून आपण हुरळून जावु नये किंवा कष्टीही होऊ नये.

     स्वयंप्रकाशी असलेल्या दिव्य ज्ञानरूपी परमात्म्याने आपल्या संकल्पाने नाना प्रकारचे विलास उत्पन्न केले तेच हे जग होय.

     समुद्रावर दिसणाऱ्या लाटा असंख्य व अपरिमित असल्या तरी त्यात असलेले पाणी एकच असते. तसेच या सृष्टीत असलेली भिन्न भिन्न कृति अनेकरूप असली तरी त्यातील नित्य, निर्विकार असलेले परमात्मस्वरूप एकच आहे असे जो ओळखतो तोच आत्मज्ञानी होय. असा आत्मज्ञानी मनुष्य सदासर्वदा जगद़्व्यवहारामध्ये निर्विकारचित्त असतो. त्याला दुःखही नसते व तापत्रयाचा त्रासही नसतो.

     वर्णाश्रम धर्मपालनात आपणांस परमात्म्याचे भिन्न भिन्न व्यवहार दृष्टीस पडतात. सर्व वर्णातील सर्व लोकांना मी पणाची जाणीव असतेच असते. तसेच ब्रह्मचर्यादि आश्रम पाळतांनाही मीपणाची जाणीव असते. यावरून सृष्टीत भिन्नत्व असले तरी त्यात एकत्व समाविष्ट झाले आहे असे ज्ञानी ओळखतात.

 *श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img