Literature

पौष वद्य नवमी

अन्नामुळे स्त्री शरीरात उत्पन्न होणारे रक्तमांसादि सप्त धातूच पुरुष शरीरातही उत्पन्न होत असल्याने पुरूषास स्त्री देहाचा मोह व स्त्रीला पुरुष देहाची इच्छा हे भेदभाव केवळ भ्रममूलच होत. या मिथ्या कल्पनेपासून विरक्त झालेल्या ज्ञानी मनुष्यास स्त्री-पुरुष देहामधील भेदभाव वाटत नाहीत तर त्या देहामध्ये ब्रह्मरूप असलेला आत्मा एकच आहे हेच त्यांना माहित असते.

     जगात उत्पन्न झालेले विविध भिन्न भाव उन्नति-अवनति, सुख-दुःख, शीत-उष्ण, लाभ-हानी ही द्वंद्वे परमात्म्यानेच आपल्या इच्छेने उत्पन्न केली आहेत. ज्याप्रमाणे नाटकांत भिन्न भिन्न पात्रे निरनिराळ्या भावना म्हणजेच सुख-दुःख, भ्रम-हास्य इत्यादि रस दाखवितात. त्याचप्रमाणे विश्वांतही नाटक चालू असते. नाटकांत काम करणारा मनुष्य दुःखाचा अभिनय करून प्रेक्षकांना दुःखात लोटतो. पण तो स्वतः आंतून जागृत असतो. दुःखित झालेल्या प्रेक्षकांना तो आत्मसात करू शकत नाही. प्रेक्षकांचे मन रसाग्रहाने उल्हासित होते. त्यामुळे ‘ वन्समोअर ‘ असे म्हणून ते दुःखाभिनय करणाऱ्या पात्रास पुन्हा जोराने अभिनय करावयास लावतात. जगद्ऱूपी नाटकांत अनेक पात्रे अनेक रसाचा अभिनय करीत असताना त्यातील सत्य असलेले परमात्मस्वरूप जाणणे हेच योग्य ठरते. त्यासाठीच आत्मज्ञानाची आवश्यकता असते. 

 *श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी* 

home-last-sec-img