Literature

पौष शुद्ध द्वितीया

जगामध्ये अविनाशी अशी एकच वस्तु वा तत्व आहे ते म्हणजे आत्मस्वरूप. उत्पत्ती असणारे अविनाशी असत नाही. उत्पत्ती हे रूप होय व रूप, दृश्यमान वस्तू दिसू शकते. जगही एकरूप असल्याने ते दृश्यमान आहे आणि म्हणूनच तेही उत्पन्न झालेले आहे. उत्पत्ती तत्वानुसार विश्व उत्पन्न झाले असल्याने ते अविनाशी नाही. ज्याला उत्पत्ती नाही ते अविनाशी व अविनाशी प्रभा हीच अमरप्रभा होय. उत्पत्ती व लयरहित वस्तु अमरवस्तू होय. अविनाशी वस्तु न जाणता जगातील सुख हेच खरे सुख आहे असे म्हणणारा खऱ्या सुखापासून वंचित असतो असे म्हणावे लागेल. असा मनुष्य नेहमी हीन, दीनच असणारा. हे अविनाशी तत्व न जाणणारा अविवेकीच.

विद्वान नेहमी परमात्मतत्व म्हणजे अविनाशी आत्मप्रभा पहातात. सूर्य, चंद्र, तारका, वीज, अग्नि इत्यादींना त्यांना प्रकाश आत्मप्रभेपासून मिळत असल्याने ते आत्मप्रभेस प्रकाश देऊ शकत नाहीत. परमात्मा स्वयंप्रकाशी आहे. सूर्य, चंद्र, अग्नि इत्यादी ज्याला प्रकाश देऊ शकत नाहीत ते प्राप्त झाल्यास जन्ममरणाचे रहाटगाडगे चुकते, तेच खरे सर्वश्रेय असे माझे स्थान असल्याचे भगवद्गितेत परमात्म्याने म्हटले आहे. परमात्मस्वरूपच सत्य ज्ञानरूप असून त्याला मर्यादा नाही. ते अनंतरूप आहे. ते ब्रह्म ज्ञानरूपच आहे.

*श्री.प.प.सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img