Literature

पौष शुद्ध प्रतिपदा

मनोभास व दृश्यजग या दोन्ही नष्ट झाल्यास ज्ञान कसे प्राप्त होणार असा प्रश्न केल्यास ‘मी’ म्हणून जे काही आहे तेच ज्ञान होय असे सांगावे लागेल. जग व मन यानंतरही शिल्लक राहणारा जो ‘मी’ तेच आत्मज्ञान होय. आत्मरूप हे शुद्धस्वरूप आहे. ‘मी’ चे खरे ज्ञान करून घेणे म्हणजेच यथार्थ ज्ञान होय आणि तेच ज्ञान आत्मशांतीला कारणीभूत आहे.

परमात्म्याच्या ठिकाणी प्रथम उत्पन्न होणारे कार्य म्हणजे मीपणाची स्फूर्ती. पिंडब्रम्हांडास मीच कारणीभूत आहे. अंधारात दोर पडला असता तो सर्प असल्याचा भास होतो तद्वत जग हे भासरूपीच आहे. म्हणून हे भासरूप जग विसरून आपल्या सत्यस्वरूपात स्थिर होऊन अमर स्वयंप्रकाशस्थिती प्राप्त करून घेणे यालाच ‘अमरप्रभा’ असे म्हणतात.

विषयवासना म्हणजे प्रवृत्ती व ती नाहीशी करणे म्हणजे निवृत्ती होय. जगातील सर्व भिन्नभाव, भेदाभेद घालवून एकात्मदृष्टीने निवृत्तीमार्गात पुढे पुढे जाणे हीच अमरप्रभेसाठी प्रत्यक्ष साधना होय. गृहस्थाश्रमातील आवश्यक कर्मकांड आचरीत सर्व विषयवासनांचा योग्य असा अनुभव घेऊन नंतर त्याच वासना हळूहळू नाहीशा करून ज्ञानवैराग्याने परमात्मप्राप्ती करून घेणे हेच परंपरागत प्रवृत्तिमार्गाचे लक्षण होय. प्रवृत्तिमार्गाचे खरे ध्येय निवृत्तीमार्गाची प्राप्ती करून घेणे हेच आहे व निवृत्तीमार्गाचे अंतिम ध्येय परमात्मप्राप्ती म्हणजेच अमरप्रभेची प्राप्ती होय.

*श्री.प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img