Literature

प्रातः स्मरण

(मंदाक्रांता)

प्रातःकालीं स्मरत मम ते शाश्वतानंदरूप ।
जे कां सर्वी असतचि सदा भासतें स्वस्वरूप ॥
जागृत्स्वप्नस्थिति मम सदा भान हे एकरूप ।
सुप्ती जे कां उरत अवघे लीन होता अरूप ॥१॥

वर्णाया ज्या श्रुति वदत ही नेति, जे कां उदास ।
नाही ज्याला अणुहि कसला भिन्नरूपें विभास ।।
अद्वैताने सघन सकली ज्या असे नित्य वास ।
ज्याच्या ध्यानी मनचि नुरतें व्हावया भिन्न भास ।।२।।

जेथोनी की सकल उमटे राहटें आणि आटें ।
जें कां सर्वी असतचि सदा एकरूपेचि दाटें ।
ऐशा ज्ञानी मम निरखितां तत्क्षणी सर्व फाटें।
येथे मी हा म्हणुनि नच को अल्प भावे हि वाटें ॥३।।

(शा. वि.) जैसें कां जलिं एकरूप जल तें जाते मिळोनी स्वतां ।
तैसें या मम चिद्रसीं सकल की थोडीहि ना भिन्नता ।।
आनंदैकरसें असे सकलिं या मीच स्वतां पाहतां ।
गेले मीपण तें विरूनि, न कळे आतां असे तत्वतां ॥४।।

जेवीं कां सरिता समुद्रि मिळतां तादात्म्य ते पाहतां ।
एकत्वेसि अनंतता विलसतां नोहे तयीं भिन्नतां ।।
तेवी या मम चिद्रसीं सकल जी जीवादि हे मीनतां ।
एकत्येंसि अपार मीचि अवघा झालो असे तत्वतां ।। ५ ।।

(वसंततिलका) जैसे तरंग उठतां निमतां न होत ।
थोडेहि भिन्न जल ते उदधी समस्त ।।
तैसेंचि की जग नि जीव लयस्थितींत ।
जो एक मी मजसि जाणुहि भिन्न मात ||६||

(आर्या) जैसे क्षार समुद्री मिळतां ते लवण एकरूप तदा।
तैसा मी चिद्रपी, मिळतां विश्वांत एकरूप सदा ।।७।।

अग्निमुखी रिघतां तें नाही की कटक नाम सोन्यातें।
तेवीं विवेकि रिघतां नाही की जगत नाम अणु मातें।। ८॥

क्षीरी क्षीरचि मिळतां क्षीरचि ते एकरूप होत असें।
जीवेश जगति सर्वहि, मजमाजी एकरूप होत असे ॥९॥

जैसा कां स्फटिकाचा सुंदर नग सूर्यरश्मि दिसताहे ।
तैसा चित् स्फटिकाचा नग मी स्वसुखाचि नित्य वसताहे ॥१०॥

अमृत सुखनिधि ऐसा मजमाजी चिद्रसैकरूपी या।
मत्स्फुरणें मीचि असा उसळे हा निमत नान जाणाया ।।११।।

मजमाजी मी रमतां मद्रूपी सहज घोष जो उमटे ।
त्या घोषासी माया म्हणत अहंरूपि जी नटे प्रगटे ॥१२ ।।

जाणीव इजमधी जी ‘मो ब्रह्म’ अशी ईश’हाचि वदताती ।।
जाणीवें नेणिव जी होत तिसी नांव ‘जीव’ देताती ।।१३।।

मायाऽविद्या यानी स्मृति-विस्मृति जाहली असे म्हणती ।
यामधि ‘मी’ जो भासे, त्याते ‘जीवेश’ नांव हे देती॥१४ ।।

विस्मृतिरूप जड हे भासे ज्या म्हणत त्यासि ‘जीव’ सदा।
यामधि ब्रह्मस्फुरणे, स्मृति यासी येत ‘ईश’ नाम तदा ।।१५।।

स्मृति-विस्मृति जीवेशा भासे माया करीत वैत्रित्र ।
त्यातेच बंध-मोक्षहि सुखदुःखे परि मसी न हे चित्र ॥१६॥

या सर्वांकारण जो, मजमाजी मीचि विलसतां सार ।
सहज उठे शब्दचि जो त्यामधि हा अखिल भास निःसार।।१७।।

जैसा घोष समुद्री होत परी त्या न किमपि ते भान ।
तैसें या शब्दाचे, निःशब्दा मज न किमपि हे भान ।। १८ ॥

सूर्यापासुनी होउनि शुक्ल-कृष्ण ढग तया न आवरिती।
त्यामधि न जेवितेविंच मायाऽविद्या न झांकती असती ।।१९।।

मिथ्या मृगजल भासे, निजरूपे सूर्य हो असे जैसा।
प्रिय अति-भाति-रूपे चित्सुखधन-भासि मी असे तैसा ॥२०॥

दोरीवरि सर्प जसा अद्वय निजि सकल भास हा भासे ।
सर्पशून्य दोरी जशि अन्य शून्य मी सदाचि हा विलसे॥२१॥

वंध्यासुतापरी हे नित्य निवृत्तचि बळेंच मेळविलें।
एकी शून्य जयापरि तेवि एक भी दुजे कुठे उरले ॥२२॥

मज न अणु विकारहि सविशेषत्वेहि होत या जगतीं ।
हो भाव निविशेषच माझा मज न च विकार ते दिसती ॥ २३ ||

श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु भगवान श्रीधरस्वामी विरचित प्रातःस्मरण संपूर्ण.
सज्जनगड शके १८५८

home-last-sec-img