Literature

फाल्गुन वद्य अष्टमी

भ्रम हा सामान्यपणे सोपाधिक व निरूपाधिक अशा दोन प्रकारांनी उत्पन्न होतांना आढळतो. मृगजळाचा भास होणे हे सोपाधिक भ्रमाचे उदाहरण होय, मृगजळ मिथ्या आहे हे जरी लक्षात आले तरीही प्रखर उन असेपर्यंत वाळवंटात मृगजळ भासमान होतेच होते. हा सोपाधिक भ्रम होय. जोपर्यंत उपाधी आहे तोपर्यंत भासमान होणारा भ्रम कायम रहाणारच. शुक्ति-रजत दृष्टांतही सोपाधिक भ्रमाचे उदाहरण आहे. रज्जुसर्प हे मात्र निरूपाधिक भ्रमाचे उदाहरण आहे. रज्जुसर्प मिथ्या आहे हे लक्षात येताच तत्क्षणीच रज्जुतील सर्पभ्रान्ति नाहीशी होते.

स्थाणुपुरूषांचा दृष्टांतही निरूपाधिक भ्रमाचे उदाहरण म्हणता येईल. सोपाधिक भ्रमाचे उदाहरण असलेल्या मृगजळाप्रमाणे जग हे मिथ्या आहे हे आपल्या लक्षात आले तरी जो पावेतो बहिर्मुखवृत्ति शिल्लक आहे तोपावेतो नेहमीप्रमाणे इंद्रियगोचर होतच राहील व जसजशी अंतर्मुखदृष्टी दृढ होत जाईल तसतशी रज्जुसर्पाच्या उदाहरणाप्रमाणे जगासंबंधी जो निरूपाधिक भ्रम आहे तो अनुभवाने हळूहळू नष्ट होईल निर्विकल्प समाधीत सुषुप्तीप्रमाणे कांही सुद्धा दृग्गोचर न होता एकमेवाद्वितीय असा आनंदच प्राप्त होईल.

*’एकमेवाद्वितीय ब्रह्मं |’ ‘हरिःॐतत्सत् |’*

*श्री.प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img