Literature

फाल्गुन वद्य एकादशी

खिरीच्या भांड्यात एक थेंब राॅकेल पडल्याप्रमाणे कार्य करताना थोडे जरी ‘अहं’ आले तर केलेले सर्व कार्य व्यर्थ जाण्यास मुळीच वेळ लागणार नाही. आपली स्तुती केली तरीही आपण निरहंकारित्व कमी होऊ न देता वाढविले पाहिजे. आपण कितीही सत्कार्ये केली तरी ती ‘कमीच’ वाटली पाहिजे व अधिक करण्यासाठी मनाचा उत्साहही वाढविला पाहिजे. कर्तृत्व व भोक्तृत्वाचा थोडाही स्पर्श न होऊ देता अभिमान सोडून कर्तृत्वबुद्धीने निष्काम कर्मे करणाराच साधक होय. त्याचे आचरण सत्यास व शास्त्रास सोडून असू नये. तो सर्वांचा विश्वासपात्र असावा. त्याचे जीवन इतरांना अनुकरणीय व आदरणीय असले पाहिजे. त्याने निंदेने निराश होऊ नये तसेच स्तुतीमुळे उल्हासित होऊ नये. सर्व प्राणीमात्रांवर शुद्ध आत्मीय प्रेम असावे.

सर्वांशी विनयाने वागावे. कोणावरही निष्ठूर न होता आपण सर्वांचे प्रीतीपात्र बनणे महद्भाग्याचे लक्षण होय. निष्कपट प्रेम व मृदु मधुर वचन, आचरण हा जगत्वशीकरणाचा महान मंत्र होय.

आपली चूक ओळखून ती चूक होऊ न देता पश्चात्तापाने वाईट वाटून घेणाराच आपला उद्धार करून घेऊ शकतो. आपली चूक ओळखणाराच मुमुक्षू तर दुसऱ्याचे दोष पाहून आपले दोष छपविण्याचा निरनिराळे प्रयत्न करणाराच बद्ध.

*श्री.प.प.सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img