Literature

फाल्गुन वद्य पंचमी

अज्ञान म्हणजे ज्ञानाचा अभाव नव्हे. त्याच्या विरूद्ध किंवा विपरीत भावना असणे यालाच आपण मिथ्याज्ञान म्हणतो व त्यालाच भ्रांती, अध्यारोप, अध्यास असेही म्हणतात. महोपनिषदांच्या पांचव्या अध्यायातील १२९ व्या श्लोकापासून १४२ व्या श्लोकापर्यंत अज्ञान हे मन, बुद्धि, अयथार्थ ज्ञान,क्रिया, अहंकार, चित्त, प्रकृति, मल, कर्म, बंध, पूर्यष्टक, अविद्या इच्छा अशा अनेकविध, रितीने समजवून सांगितले आहे. अज्ञानाला असत्, जड, तम, मोह, तुद्य अशी नावेही दिलेली आढळतात. अद्वितीय ब्रह्मतत्त्वांत ज्यामुळे तद्विरूद्ध भिन्न, विविधता इत्यादी दिसून येतात त्यासच ही सर्व नांवे दिली आहेत हेच यांचे तात्पर्य.

सजातीय, विजातीय, स्वगत इत्यादी कोणतेही भेद नसणारे, म्हणूनच निर्गुण, निराकार असे जे अखंड ब्रह्म, त्या ब्रह्मांत किंचीतही भिन्नत्व आढळून येत नाही हे निःसंशय एकमेव असणाऱ्या ब्रह्मामध्ये जग कल्पिणे हा विकल्प खोटा आहे. निर्विकार, निराकार, निर्विशेष असे असूनही सर्वठिकाणी व्यापलेल्या ब्रह्मांत भिन्नता कोठून असणार ? एकात्म म्हणजेच अद्वितीय असे जे ब्रह्मतत्त्व त्यामध्ये भेद उत्पन्न करणारा कसा असू शकेल ? असा अध्यात्मोनिषदांत आक्षेपकांना प्रश्न विचारला आहे.

*श्री.प.प.सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img