Literature

फाल्गुन वद्य षष्ठी

जो सर्वभूतांच्या ठिकाणी आपलेच भगवत्स्वरूप पहातो आणि भगवत्स्वरूप असणाऱ्या आपल्याच ठिकाणी जो सर्वभूतांचे दर्शन घेतो, आपल्याच ठिकाणी ज्याला सर्वभूतांचा अंतर्भाव झालेला दिसतो तोच ‘भागवतोत्तम’ असेच भागवतोत्तम आमचे ‘नाथ’ होते बरं ! त्यांची एकगोष्ट बघू !

नाथ काशीहून गंगेची कावड रामेश्वरला नेत होते. वाटेत त्यांना एका गाढवाचा प्राण जाण्याचा बेतांत आलेला असून गाढवाचे मालक असलेले नवराबायको जवळच बसलेले दिसले. तहान लागल्याने ते गाढव तडफडत होते. मालकांने नाथांची प्रार्थना केली. महाराज! आपल्या कावडीत गंगा आहे. माझे गाढव तहानेने इतके तडफडते की त्यामुळे त्यास मरणप्राय दुःख होत आहे. तेव्हा आपण आणलेली गंगा त्याच्या तोंडात सोडा म्हणजे त्याचे प्राण वाचल्यासारखे होईल. अहो ! सर्व प्राणीच की ! सर्वांचे दुःख सारखेच. आपणांस जसे सुखदुःख होते तसेच सर्वभूतांनाही होते, ही कल्पना ध्यानांत ठेवून त्यांच्या अडचणीच्या वेळी त्यांना सहाय्य करणे हे विवेकाचे कार्य होय. तेव्हा पहा ! विचार करा ! हे ऐकताच नाथांनी कसलाही विचार न करता ‘अप्सु औषधेषु नमोऽस्तु रूद्राय |’ असा मंत्र म्हणून गाढवाच्या तोंडात गंगा ओतली. ते गाढव उठून उभे राहिले. ती नवराबायको प्रत्यक्ष विठ्ठल रखुमाईच होते ते संतुष्ट झाले.

*’आत्मवत् सर्व भूतेषु यः पश्यति य पश्यति |’*

*श्री.प.प.सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img