Literature

फाल्गुन शुद्ध अष्टमी

ज्याच्या दयेने अनंत गुणरूप असे सकल ऐश्वर्य प्राप्त होते अशा सच्चिदानंदस्वरूप परमात्म्याचे अनन्य आसक्तिभावाने ध्यान केल्यास सर्व काही प्राप्त होते. परमात्म्याच्या ध्यानाने आपल्या मनास अद्वितीय आनंद प्राप्त होतो. आनंदवृत्ती हाच सुखाचा झरा होय. त्यामुळेच परमसुख सुलभतेने प्राप्त होते. म्हणून मन नेहमी भगवद्भक्तीतच तल्लीन केले पाहिजे. नामस्मरण, ध्यान तल्लीनता हे भक्तीचे प्रेरक आहेत.

कर्मे करीत असतांना ती सर्व परमेश्वरार्पण बुद्धींनी केली पाहिजेत. सर्व कर्माचा त्यागही परमेश्वरासाठीच असला पाहिजे.

‘मी सनातन, शाश्वत, सर्वश्रेष्ठ आहे असे समजून माझी भक्ति केली पाहिजे.माझ्याशिवाय कोणतीही वस्तु नाही, कोणतेही सुखकर नाही अशा भावनेने सदासर्वदा माझीच आराधना करावी. सकल प्राणिमात्रांत सर्वात्मस्वरूप होऊन मीच आहे यावर विश्वास असावा.एखाद्यावेळी कोणत्याही प्राण्याकडून वाईट गोष्ट घडली तरी त्यामध्ये द्वेषबुद्धी न ठेवता निर्वैर भाव ठेवावा. अशाप्रकारे जे भक्त वागतात ते मला प्राप्त करून घेतात. म्हणजेच माझ्यास्वरूपी लीन होतात. म्हणूनच ते नित्य सुखी होतात. असे लोक माझे खरे भक्त होत व खरी ईश्वरभक्ती.’ असा भगवंतानी गीतेमध्ये उपदेश केला आहे.

*श्री.प.प.सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img