Literature

फाल्गुन शुद्ध एकादशी

भक्त हा परमात्मप्रीतीसाठीच जगत असतो. तो नेहमी परमात्मस्वरूप पहातो म्हणजे त्याने कोणत्याही वस्तुकडे पाहिले तरी तीमध्ये त्यास परमात्म्याचे स्वरूपच दिसते ; तो कानाने जे ऐकतो ती सर्व परमात्म्याची कथाच; तोंडाने तो परमात्म्याचा गुणगान करतो. त्याच्या तोंडातून अनृत, असत्य, परनिंदा इत्यादी दुर्वाक्ये कधीच बाहेर पडत नाहीत. तो आपल्या सर्व इंद्रियर्माद्वारे परमात्म्याचीच सेवा करीत असतो. त्यांचे जगणेही परमात्म्यासाठीच असते. त्याची कर्मे म्हणजे परमात्म्याचीच सेवा. त्यांचे मन नेहमीच परमात्मध्याननिरत असते. तो परमात्म्याच्या दर्शनाचीच इच्छा करीत असतो; इतर कोणत्याही इच्छा तो करीत नाही म्हणूनच तो *’स लोकबाह्य |* होऊन जनसमुदायापासून दूर असतो व असे जे भक्त आहेत ते डोळे झांकून चालले तरी परमात्मा त्यांना योग्य मार्गदर्शन करतो.

‘सर्व विसरून माझाच आश्रय घेणारे जे माझे भक्त आहेत त्यांचा योगक्षेम मी चालवितो’ असे परमात्म्याने म्हटले आहे हेच भक्तीचे महत्त्व होय. हीच भक्तांची जन्मसार्थकता !! भक्त कबीराचे विणण्याचे काम परमात्माच करीत असे. जे परमात्म्यासाठी सर्व कांही करतात. त्यांच्यासाठी परमात्मा आपल्या सर्वशक्तींचा उपयोग करून त्यांची सर्व कार्ये सिद्धीस नेतो.

*श्री.प.प.सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img