Literature

फाल्गुन शुद्ध तृतीया

आपल्या स्वतःच्या प्रकाशाने प्रकाशित होणारा आत्मा होय व आत्मा या शब्दाने आपण गुरूंची ओळख करून घेतली पाहिजे.

देवांचे देह प्रकाशमान असून स्वर्गदिलोकांतील भोग दिव्य असले तरी तेथे मीपणाचा अनुभव येतोच. मीपणावाचून कोणतीही व्यक्ति नाही. या सर्वांचे यथार्थस्वरूप म्हणजे स्वयंप्रकाशी आत्मा ही एकच वस्तु होय.देह म्हणजेच आत्मा नव्हे. कारण आत्मा स्वयंप्रकाशी आहे. तोच देहांत मीपणा उत्पन्न करतो. सामान्यतः मी म्हणजे देह अशी कल्पना केली जाते. पण मी म्हणजे स्वयंप्रकाशी गुरू असे ज्ञान होणे आवश्यक आहे.

*’ तत्त्वं गृण्हाति इति गुरूः | ‘* तत्त्व जाणणारा गुरू होय. वस्तुस्थितीचे यथार्थज्ञान देणारी महाशक्ति म्हणजेच गुरू. कोणत्याही अपेक्षा न करता आपले आपणच संपूर्ण आनंदघनरूप आहे, तेथे दुःख शोकाला वाव नाही, तेथे अशांततेचा वाराही नाही, देह वगैरे काही नाही, आपल्याच अस्तित्त्वाने व स्वयंप्रकाशाने प्रकाशित होणारी व्यक्ति म्हणजेच गुरू.
गुरू व देव आदींच्या दर्शनास शुचिर्भूतपणे सोवळ्यानेच गेले पाहिजे. ओवळीवस्त्रे सोडून, तीर्थस्नान करून सोवळे नेसून जाणे असा याचा अर्थ नव्हे तर देहाभिमानीरूपी ओवळे टाकून देऊन, सद्गुरूरूपी ज्ञानगंगेत स्नान करून, आत्मभावनारूपी सोवळे नेसून जाणे असा याचा अर्थ होय.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img